पीटलाइनच्या कामात कासवगती; मुदत उलटली,नव्या रेल्वे कधी?
By संतोष हिरेमठ | Published: February 13, 2024 01:56 PM2024-02-13T13:56:19+5:302024-02-13T14:00:02+5:30
डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे होते लक्ष्य
छत्रपती संभाजीनगर : शहरातून नव्या रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टीने पीटलाइन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, पीटलाइनच्या कामाची मुदत उलटली आहे. आजघडीलाही काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे पीटलाइन कधी होणार आणि प्रत्यक्षात नव्या रेल्वे कधी मिळणार, असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पीटलाइनचा पायाभरणीचा समारंभ झाला परंतु, प्रत्यक्षात पीटलाइनच्या कामाला सुरुवात होण्याची प्रतीक्षाच करावी लागली. पायाभरणी समारंभाच्या तब्बल ६ महिन्यांनंतर एप्रिल २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर पीटलाइनच्या कामाचा ‘श्रीगणेशा’ झाला होता. हे काम डिसेंबरअखेर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते; परंतु अजूनही काम सुरुच आहे. हे काम कधी संपणार, याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, याविषयी काही सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.
पीटलाइनचा असा होईल फायदा
पर्यटनाची राजधानी, औद्योगिक, शैक्षणिक केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगर मर्यादित रेल्वे जाळ्यांमुळेमागे पडत आहेत. छत्रपती संभाजीनगरहून नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जाते. परंतु पीटलाइन नसल्याने नवीन रेल्वे सुरू करण्यास अडचण असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असे. आता पीटलाइन झाल्यामुळे नवीन रेल्वे सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अशी होतेय पीटलाइन
- १६ बोगींची कॅमटेक न्यू डिझाइन पीटलाइन.
- सर्व्हिस बिल्डिंग.
- बोगींचे निरीक्षण, स्वच्छता आणि पाणी भरण्याची सुविधा.
- बोगींच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित प्लँट.
निधी किती?२९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये