पाणंद रस्त्यांची कासव गती; आठ महिन्यांत अवघे ७४ रस्ते पूर्ण, दोषी कोण ?
By विजय सरवदे | Published: December 5, 2023 01:27 PM2023-12-05T13:27:37+5:302023-12-05T13:31:33+5:30
दिरंगाईसाठी ‘मनरेगा’ व ग्रामपंचायतींची एकमेकांकडे बोटे
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाने मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यासाठी १ हजार ५९० रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत अवघे ७४ रस्तेच पूर्ण होऊ शकले. त्यामुळे येणाऱ्या चार महिन्यांच्या कालावधीत रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, हा प्रश्न आहे.
दरम्यान, लटकलेल्या रस्ते कामांबाबत गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. या विभागामार्फत सांगितले जाते की, रोजगार हमीच्या कामांवर ५४ हजार मजूर काम करीत आहेत. एवढेच नव्हे, तर रोजगार हमीच्या कामांसाठी उद्दिष्टापेक्षा मनुष्य राबलेल्या दिवसांचे प्रमाण १५५ टक्के साध्य झाले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून गुरांचा गोठा, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी व अन्य कामांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ त्या कामांतच व्यस्त आहे. परिणामी, पाणंद रस्त्यांची कामे गतीने होत नाहीत. असे असले तरी, वर्षभरासाठी निश्चित केलेल्या रस्त्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाने सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे बोलले जाते.
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा आहे. मात्र, पाणंद रस्ते अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याची ने-आण करताना मोठी कसरत करावी लागते. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाणंद रस्त्याच्या कामावर भर दिला जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याकडे मात्र, कोणी गांभीर्याने घेत नाही, हे विशेष!
७२३ कामे प्रगतिपथावर
यासंदर्भात ‘मनरेगा’ विभागाकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणंद रस्त्यांची जिल्ह्यात १ हजार ५९० कामे करण्याचे लक्ष आहे. दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर कालावधी यापैकी ७४ पाणंद रस्ते तयार झाले असून, ७२३ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. मार्चअखेरपर्यंत या रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.