मावशीकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:08 PM2021-03-25T12:08:30+5:302021-03-25T12:09:27+5:30
पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने ती लहानपणापासून रांजणगाव परिसरात मावशीकडे राहत होती.
वाळूज महानगर : १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पुण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द बुधवारी (दि. २४) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने ती लहानपणापासून रांजणगाव परिसरात मावशीकडे राहत होती. तिची मावशी व काका हे दोघे १६ मार्चला कामासाठी घराबाहेर पडले होते. घरमालकाने तिच्या मावशीला संपर्क साधून, मुलगी घरी नसल्याचे सांगितले. मावशी व तिच्या पतीने घरी येऊन तिचा शोध सुरू केला. ती न सापडल्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार ठाण्यात दिली.
पोलीस तपासात, तिला पवन दुगमोगरे (२१, रा. रांजणगाव परिसर) याने आमिष दाखवून पळवून नेल्याचे समोर आले. पवन तिला घेऊन भांगसीमाता गड परिसरात गेला. या परिसरात एक दिवस मुक्काम केल्यानंतर त्याने तिला पुण्यात शिवाजीनगरात नेले. पुण्यात त्याने तिच्यावर अत्याचार केले. पैसे संपल्यानंतर पवन तिला घेऊन मंगळवारी (दि. २३) वाळूज एमआयडीसीत परत आला. पोलिसांनी पवनच्या तावडीतून तिची सुटका केली. वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपी पवन दुगमोगरे यास अटक केली. पीडितेने नातेवाईक़ाकडे राहण्यास नकार दिल्याने बुधवारी तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रीती फड तपास करीत आहेत.