चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण करून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:34 PM2019-04-19T23:34:44+5:302019-04-19T23:35:51+5:30
महाविद्यालयात शिकत असताना काढलेले फोटो परत देण्याच्या बहाण्यातून विवाहित तरुणीला बोलावून, चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर खोलीत डांबून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल संतोष थिटे असे या आरोपीचे नाव आहे.
औरंगाबाद : महाविद्यालयात शिकत असताना काढलेले फोटो परत देण्याच्या बहाण्यातून विवाहित तरुणीला बोलावून, चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर खोलीत डांबून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल संतोष थिटे असे या आरोपीचे नाव आहे.
सदर विवाहिता (२०) एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकेदिवशी मित्र-मैत्रिणींसह विद्यापीठ परिसरात फिरायला गेले होते. त्यामध्ये अमोल संतोष थिटे हाही होता. त्या ठिकाणी त्या तरुणीचे जीन्स पॅन्ट आणि टॉपवर काही वैयक्तिक फोटो त्याने काढले. काढलेले फोटो देण्याची मागणी या तरुणीकडून अमोलकडे केली जात होती; परंतु तो देण्यास टाळाटाळ करीत होता. मे २०१८ मध्ये या तरुणीचा शहरातील एका तरुणाबरोबर विवाह झाला. विवाहानंतर तरुणीने अमोलकडे फोटो देण्याची मागणी केली; परंतु पुन्हा टाळाटाळ झाल्याने तरुणीने अमोलला शिवीगाळ केली होती.
फोटो कारमध्ये ठेवल्याचे सांगून लावला चाकू
८ मार्च २०१९ रोजी अमोलने या तरुणीला कॅनॉट भागातील एका दुकानासमोर फोटो घेण्यास बोलावले. त्यानुसार सकाळी ११ वाजता तरुणी त्या ठिकाणी पोहोचली. फोटो कारमध्ये ठेवले आहेत असे म्हणून अमोलने तरुणीला कारकडे नेले. त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवीत कारमध्ये बळजबरीने बसविले. चालकाने कार थेट वाशिमला नेली. त्या ठिकाणी अमोलने तरुणीला एका खोलीत कोंडून एक महिना अत्याचार केला.
तरुणीचा शोध घेत चुलत मामा वाशिम येथे दाखल झाला. त्याने तरुणीला सोबत घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वडिलांनी तिला सासरी आणून सोडले. सासरच्या मंडळींना घडलेली हकीकत सांगितल्यानेतर त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून अमोल थिटे याच्या विरोधात अत्याचार, अपहारण, धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अमोलला मदत करणाऱ्या अफसर शाहलाही सहआरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाचोळे करीत आहेत.