लग्नाच्या आमिषाने अत्याचार, गर्भवती होताच नकार; पुन्हा ब्लॅकमेल केल्याने तरुणीने संपवले जीवन
By राम शिनगारे | Published: March 11, 2024 11:33 AM2024-03-11T11:33:57+5:302024-03-11T12:26:25+5:30
पिसादेवीतील घटनेत मायलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. त्यातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही लग्नाविनाच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियकर ब्लॅकमेल करून लागला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली. ही घटना पिसादेवी परिसरात घडली. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या आईच्या विरोधात लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंदवला आहे.
प्रियकर ऋषिकेश विनायक तळेकर व त्याची आई सुरेखा विनायक तळेकर (रा. अयोध्यानगर, एन-७, सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार दीक्षा (नाव बदललेले) ही आरोपी ऋषिकेशसोबत २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होती. याच कालावधीमध्ये आरोपीने दीक्षाला लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला दिवस गेले. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने जबरदस्तीने दीक्षाला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही ऋषिकेश लग्नाविनाच तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. ती दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून त्याने तिला बदनामीची भीती दाखवत जबरदस्ती सुरू केली. तेव्हा तिने आरोपीला विनंती केली. त्याने नकार देत लग्न न करताच सोबत राहण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. सततच्या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मामाला पाठवली सुसाईड नोट
दीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी मामाच्या मोबाईलवर स्वत:च्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट पाठविली. त्यात माझा ऋषिकेशकडून छळ सुरू आहे. त्याच्या त्रासाला कंटाळूनच मी आत्महत्या करीत आहे. २०१८ पासून दोघे रिलेशनशिपमध्ये होतो. त्यातून गर्भवती राहिले. तेव्हा ऋषिकेशने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही संबंध ठेवण्यासाठी तो ब्लॅकमेल करीत होता. त्याविषयीची माहिती त्याच्या आईला दिल्यानंतर तिनेही मलाच मारहाण करीत धमकी दिल्याचेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.