लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 07:31 PM2018-11-16T19:31:13+5:302018-11-16T19:31:51+5:30
ओळखीच्या व्यक्तीनेच विवाहितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजत चिमुकल्यासमोर तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली.
औरंगाबाद : ओळखीच्या व्यक्तीने विवाहितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजत चिमुकल्यासमोर तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास करून आरोपी नराधमाला १५ नोव्हेंबर रोजी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले. चरण प्रेमसिंग सोनावले (२५,रा. शूलिभंजन, ता. खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे.
जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, २४ वर्षीय पीडितेचा पती मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पीडितेला एक मुलगा आणि मुलगी असून, आरोपी आणि ती बालपणापासून ओळखीचे आहेत. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. पीडिता ही दिवाळीनिमित्त गारखेडा परिसरात भावाच्या घरी आली होती. १२ रोजी सायंकाळी पीडिता मुलासह पतीवरील दोषारोपपत्र आणण्यासाठी जिल्हा न्यायालयात पायी जात होती. त्यावेळी दर्गा रस्त्यावरील एका रुग्णालयाजवळ आरोपी कार घेऊन तेथे आला. तुला कारमधून न्यायालयात सोडतो असे म्हणून तिला कारमध्ये बसविले. गाडीत बसल्यानंतर त्याने पीडितेला व तिच्या मुलाला त्याच्या बाटलीतील पाणी पिण्यास दिले. ते पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच पीडिता व तिच्या मुलाला गुंगी आली.
पीडितेला शुद्ध आली तेव्हा ती एका मोडक्या घरातील अंधाऱ्या खोलीत होती. तेथे आरोपीने तिला शिवीगाळ करून तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हातपाय बांधून तिला मारहाण केली आणि तिच्या चिमुकल्यासमोरच तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी पीडिता शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसले. त्यानंतर ती मुलाला घेऊन पळून जात असताना आरोपीने त्यांना पकडले आणि शिऊर बंगला येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार केले. नंतर तिला तो आत्याच्या घरी घेऊन गेला. १४ रोजी सकाळी त्याने तिला माहेरी आणून सोडले आणि गायब झाला. झालेल्या अत्याचाराची माहिती पीडितेने नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर ते तिला सोबत घेऊन जवाहरनगर ठाण्यात आले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीला बुधवारी रात्री अटक केली.