टोसिलिझुमॅब, इटोलीझुमॅबचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:06+5:302021-04-23T04:05:06+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या काही रुग्णांना टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन द्यावे लागते. रुग्णसंख्येमुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे त्याला पर्याय ...
औरंगाबाद : कोरोनाच्या काही रुग्णांना टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन द्यावे लागते. रुग्णसंख्येमुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून इटोलिझुमॅब या इंजेक्शनचा पर्याय सुचविण्यात आला; परंतु आजघडीला या इंजेक्शनचाही ठणठणाट आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांत अडथळा येत आहे.
शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत आहे; परंतु टोसिलिझुमॅबअभावी आता रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. हे इंजेक्शन शहरात उपलब्धच नाही. टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन कोरोनासंसर्गाच्या उपचारावर खात्रीशीर उपयुक्त ठरतात, असा कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र, तरीही काही रुग्णांमध्ये याचा वैद्यकीय लाभ दिसून आल्यामुळे ही इंजेक्शन दिली जातात. मागणी वाढल्याने तसेच पुरवठा कमी झाल्याने या इंजेक्शनची उपलब्धता नाही. त्यामुळे ‘टोसिलिझुमॅब’ऐवजी पर्याय म्हणून इटोलिझुमॅब वापरण्याची सूचना दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून करण्यात आली; परंतु हे इंजेक्शनही शहरात मिळेनासे झाले आहे.
सूज कमी करण्यासाठी वापर
सर्व कोरोना रुग्णांना टोसिलिझुमॅब, इटोलिझुमॅब हे इंजेक्शन लागत नाहीत; परंतु कोविड रुग्णांच्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी यांचा वापर केला जातो. ते उपलब्ध नसल्याने त्याला पर्याय शोधावा लागत आहे.
-डाॅ. वरुण गवळी, चेस्ट फिजिशियन
४ इंजेक्शन उपलब्ध
टोसिलिझुमॅब सध्या उपलब्ध नाही, तर इटोलिझुमॅबची ४ इंजेक्शन उपलब्ध आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) सहआयुक्त संजय काळे यांनी दिली. रेमडेसिविर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले.