तब्बल १७०० गुन्हेगार औरंगाबाद पोलिसांना सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 07:25 PM2019-06-10T19:25:49+5:302019-06-10T19:28:17+5:30
सुमारे २० वर्षांपासून वाँटेड गुन्हेगारांची यादी वाढतच आहे
औरंगाबाद : सुमारे वीस वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर वाँटेड आणि फरारी गुन्हेगारांची यादी सतत वाढतच असल्याचे समोर आले. पोलिसांच्या रेकॉर्डवर १ हजार ७२२ वाँटेड गुन्हेगार असून, ते पोलिसांना सापडत नाहीत. या फरारी गुन्हेगारांची यादीच पोलीस आयुक्तांनी त्यांच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) टाक ली आहे.
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत १७ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. प्रत्येक ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. बऱ्याचदा कारवाईदरम्यान गुन्हेगार पोलिसांना चकमा देतात, तर काही पकडले जातात. अशावेळी आपल्या साथीदारांना वाचविण्यासाठी पळून गेलेल्या गुन्हेगारांची अर्धवट आणि चुकीची नावे आणि पत्ता देतात. परिणामी, पोलिसांच्या दप्तरी गुन्हेगारांच्या यादीत चुकीची आणि अर्धवट नावांची नोंद होते. अर्धवट आणि चुकीचे नाव, पत्ता असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होत नाही. यामुळे मागील वीस ते बावीस वर्षांपासून पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांतर्गत फरारी गुन्हेगारांची यादी वाढतच आहे.
या यादीनुसार सर्वाधिक फरार आरोपींमध्ये क्रांतीचौक प्रथम क्रमांकावर आहे. क्रांतीचौक ठाण्यात गुन्हे नोंद झालेले ३२२ आरोपी पोलिसांना सापडत नाहीत, तर दुसऱ्या स्थानी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील २२३ गुन्हेगार पोलिसांना वाँटेड आहेत, तर १९९ फरार गुन्हेगारांचे ओझे डोक्यावर असलेले सिडको ठाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुकुंदवाडी १५९, सिटीचौक १७५, जिन्सी ११२, जवाहरनगर ११५, छावणी १०५,उस्मानपुरा ५५, सातारा ४३, हर्सूल १६, एमआयडीसी सिडको ९०, वाळूज ५७, बेगमपुरा ठाणे ३३, दौलताबाद ठाणे ४ आणि वेदांतनगर ठाण्यातील ३ गुन्हेगार पोलिसांना सापडत नाहीत. विशेष म्हणजे गतवर्षीच सीआरपीसी २९९ नुसार ही यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.
गुन्हेगारांची यादी कमी करण्यासाठी प्रयत्न
याविषयी बोलताना गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध ठाण्यांतर्गत पाहिजे असलेल्या आरोपींच्या गतवर्षीच्या यादीतील सुमारे शंभर गुन्हेगार कमी झाले आहेत. यातील अनेक गुन्हेगार स्वत:हून परस्पर कोर्टात हजर होतात. त्याविषयीची नोंद रेकॉर्डला घेऊन यादीतून त्यांची नावे कमी केली जात आहेत. शिवाय पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.