औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात वर्षभरात जन्मले २७३ ‘जुडवा’ आणि ८ तिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:10 PM2018-01-05T12:10:24+5:302018-01-05T12:13:24+5:30
चित्रपटांप्रमाणे अगदी खर्या अर्थाने अनेक कुटुंबियांत जुळी मुले जन्माला येतात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ८ तिळे बालकही या ठिकाणी जन्मले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जुळ्या व्यक्तिमत्त्वांवर आधारित अनेक हिंदी-मराठीत चित्रपट आले आहेत. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या चित्रपटाचा रिमेकही नुकताच चांगलाच चर्चिला गेला. या चित्रपटामध्ये जुळ्या मुलांच्या बिछडण्याचा आणि परत भेटण्याच्या धमाल गमती दाखविल्या जातात. चित्रपटांप्रमाणे अगदी खर्या अर्थाने अनेक कुटुंबियांत जुळी मुले जन्माला येतात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ८ तिळे बालकही या ठिकाणी जन्मले.
बाळाचा जन्म ही प्रत्येक मातेसाठी, कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात मोठी आनंददायी गोष्ट असते. गरोदरपणात मुलगा की मुलगी असा अंदाज काहींकडून वर्तविला जातो. आधुनिक जगात मुलगा आणि मुलगी हा भेद कधीच संपला आहे. त्यामुळे या अंदाजापेक्षा बाळाचा जन्म हा प्रत्येकासाठी अधिक महत्त्वाचा असतो. नऊ महिने काळजी घेतल्यानंतर जन्माला येणार्या बाळाने आयुष्यच बदलून जाते, अशा वेळी जुळ्यांचा जन्म झाला तर होणारा आनंदही दुप्पट. जिल्ह्यात जुळ्यांचा जन्म होण्याची संख्या अधिक दिसते. अगदी चित्रपटांमध्ये दिसणारे जुळ्या मुलांचे चित्र अनेक कुटुंबांमध्ये दिसून येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग सर्वाधिक व्यस्त आणि गर्दीचा विभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. प्रसूतीसाठी जिल्हाभरातून गरोदरमाता घाटीत दाखल होतात. गेल्या वर्षभरात या ठिकाणी तब्बल १७ हजार ९३७ प्रसूती झाल्या. यामध्ये ९ हजार १२० मुले, तर ८ हजार ४४८ मुलींचा जन्म झाला. विशेष म्हणजे वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला, तर ८ तिळेही जन्मले. हा आकडा पाहून अनेकांच्या भुवया उंचवतात. सुरक्षित मातृत्वासाठी घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या ठिकाणी नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे. येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी रुग्णसेवेसाठी कायम दक्ष असतात. त्यामुळे सुरक्षित मातृत्वाची यशस्वी कामगिरी हा विभाग बजावत आहे.
सुरक्षित मातृत्व
गेली अनेक वर्षे घरी बाळंतपण होण्याचे प्रमाण चिंताजनक होते; परंतु आता जननी सुरक्षा या सारख्या योजनांमुळे सुरक्षित मातृत्व प्राप्त होण्यास हातभार लागत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गरोदर मातांना चांगली उपचार पद्धती दिली जात आहे. त्यासाठी सर्वजण कायम तत्पर असतो.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, घाटी