तोतया पोलिसाने ६२ वर्षीय वृद्धाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:05 AM2021-02-06T04:05:26+5:302021-02-06T04:05:26+5:30
जालना जिल्ह्यातील बारसवाडा येथील भगवान गणपत गायकवाड हे पैठण येथे नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. पाचोड ते पैठण ...
जालना जिल्ह्यातील बारसवाडा येथील भगवान गणपत गायकवाड हे पैठण येथे नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. पाचोड ते पैठण रस्त्यावरील थेरगाव शिवारातून जाताना पाचोड कडून एका दुचाकीवरून दोघेजण आले. भगवान गायकवाड यांची दुचाकी अडवून विचारपूस केली. तुम्ही इतक्या सुसाट वेगाने कुठं जात आहात. आम्ही पोलीस आहोत, आम्हाला तुमची तपासणी करायची आहे. असं म्हणताच तोतया पोलिसांनी एक पोलीस निरीक्षक असल्याचे ओळखपत्र दाखविले. त्यामुळे भगवान गायकवाड यांना पोलीस असल्याचा विश्वास बसला. तुम्ही सोन्याचे दागिने एका रूमालात बांधून ठेवा. हा रुमाल पैठणला गेल्यावर उघडा, असे म्हणून या भामट्याने हातचलाखी करून एक तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास करत तेथून त्यांनी पळ काढला. ही बाब गायकवाड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती राम गटकळ यांना दिली. यावेळी पाचोड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली.
---
सहा महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना
सहा महिन्यांपूर्वीसुद्धा पाचोडला अशीच एक घटना घडली होती. अंकुश भुमरे पाटील हे दुपारी आपल्या शेतात जात असतांना पाचोड ग्रामपंचायतीसमोर काही अंतरावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगितले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व सोन्याची अंगठी लूटमार करून नेली. दरम्यान, भरदिवसा लूटमारीचा प्रकार घडल्यामुळे पाचोड परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.