सिल्लोडमध्ये सत्तार-सुरेश बनकर यांच्यात थेट लढत; सत्तारांच्या भाजपासोबत वादाने चुरस वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:05 PM2024-11-05T17:05:43+5:302024-11-05T17:06:37+5:30
महाविकास आघाडीत जाऊन तिसऱ्यांदा विधानसभा लढविणाऱ्या बनकर यांना भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सिल्लोड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३५ पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतली. आता एकूण २४ उमेदवार रिंगणात असून, खरी लढत महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यातच होणार आहे.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात १९९५, १९९९ व २००४ असे सलग तीन वेळा विजय मिळविणाऱ्या भाजपाला २००९ व २०१४ मध्ये भाजपाच्या सुरेश बनकर यांना विजय मिळवून देता आला नाही. २०१९ मध्ये युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने यावेळी सेनेकडून लढून अब्दुल सत्तार यांनी विजयाची हॅट् ट्रिक केली. आता चौथ्यांदा विजय मिळविण्यासाठी सत्तार यांनी कंबर कसली आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा भाजपाचा सोडून उद्धवसेनेत आलेले महाविकास आघाडीचे सुरेश बनकर हे उमेदवार आहेत. तिसऱ्यांदा विधानसभा लढविणाऱ्या बनकर यांना भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजपाचे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून सत्तार आणि भाजपा नेत्यांमधील वाद पराकोटीला गेला आहे. अशात मनोज जरांगे-पाटील यांनी या उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने बनकर यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सत्तार मुरब्बी राजकारणी
महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते त्यांच्या विरोधात असले तरी हा विरोध गृहीत धरून त्यांनी वेगळी रणनीती आखल्याची चर्चा आहे. तगडा जनसंपर्क, मतदारसंघात केलेली विकासकामे आणि शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी केलेला प्रचार मतांमध्ये परावर्तीत करण्यात त्यांना कितपत यश मिळेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार
१) अब्दुल सत्तार अब्दुल नबी (महायुती ), २) सुरेश पांडुरंग बनकर (महाविकास आघाडी), ३) संगपाल चिंतामण सोनवणे (बहुजन समाज पार्टी), ४) बनेखा नूरखा पठाण (वंचित बहुजन आघाडी), ५) राजू अफसर तडवी (भारतीय ट्रायबल पार्टी), ६) ॲड. शेख उस्मान शेख ताहेर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), अपक्ष उमेदवार : ७) अनिल मदन राठोड, ८) अफसर अकबर तडवी, ९) अरुण चिंतामण चव्हाण, १०) अशोक विठलं सोनवणे, ११) दादाराव श्रीराम आळणे, १२) राजू अशोक गवळी, १३) परिक्षित माधवराव भरगाडे, १४) सुरेश पांडुरंग बनकर, १५) भास्कर शंकर सरोदे, १६) रफिक मनव्वरखान पठाण, १७) राजू पांडुरंग साठे, १८) राहुल अंकुश राठोड, १९) विकास भानुदास नरवडे, २०) शरद अन्ना तिगोटे, २१) शेख मुख्तार शेख सादिक, २२) श्रावण नारायण शिनकर, २३) सचिन दादाराव हावळे, २४) संदीप एकनाथ सुरडकर.