पर्यटन ठरले जीवघेणे! येलदरी धरणात पोहताना वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा पाण्यात बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 12:07 PM2023-05-08T12:07:02+5:302023-05-08T12:07:29+5:30
वडील आणि मुलगा धरणाच्या जलाशयात उतरले मात्र पोहता येत नसल्याने मुलगा बुडाला
सेनगाव ( हिंगोली ) : येलदरी धरणाच्या जलशयात शनिवारी बुडालेल्या १६ वर्षीय मुलाचा अखेर रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला. रोहन संजय कल्याणकर असे मृत मुलाचे नाव आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती सेनगाव पोलिसांनी दिली.
जिंतूर शहरातील नामदेव नगर येथील संजय कल्याणकर कुटुंब शनिवारी येलदरी धरण परिसरात ( ता. सेनगाव) पर्यटनासाठी आले होते. दरम्यान, वडील व रोहन हे धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने 16 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांनी पाण्यात रोहनचा शोध घेतला मात्र शनिवारी सायंकाळी त्याचा शोध लागला नाही.
दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ग्रामस्थ आणि पोलिसांना जलाशयात खोलवर रोहनचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जिंतूर येथे मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुपडे, बीट जमादार कानबाराव थिटे राजेश जाधव, संदीप पवार, अमोल चिकने, भीमराव चिंतारे तसेच स्थानिक मासेमारी करणारे यांनी मदत कार्य केले.
जलाशयाच्या खोलीचा अंदाज येत नाही
जिंतूर-सेनगाव तालुक्याच्या हद्दीवर हिंगोली वन विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले वन उद्यान पाहण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, येलदरीचा विस्तीर्ण तलाव व पाण्याच्या खोलीचा अंदाज नवीन पर्यटकांना लवकर येत नाही. यातून दुर्घटना घडत आहेत. प्रशासनाने याबाबत इशारा देणारे फलक लावून पर्यटकांना पाण्यात उतरण्यास मज्जाव करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.