औरंगाबाद जिल्हा परिषद आकारणार पर्यटन कर, अजिंठा - वेरूळ आणि दौलताबादचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:33 AM2018-06-02T11:33:42+5:302018-06-02T11:34:27+5:30
अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून ‘पर्यटक कर’ आकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे
औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून ‘पर्यटक कर’ आकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, सध्या यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
यासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत सोळंके यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. दौलताबाद, वेरूळ आणि अजिंठा येथे दर्जेदार सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल. या हेतूने पर्यटक कराची संकल्पना पुढे आली.
जमा होणाऱ्या पर्यटक कराच्या माध्यमातून पर्यटनस्थळी सुलभ शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग, कचऱ्याचे व्यवस्थापन, रस्ते आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. मागील सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सदरील पर्यटक कर हा व्यक्तीला आकारलेला कर असल्यामुळे त्यास शासनाची मंजुरी अनिवार्य आहे. नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव एक- दोन दिवसांत शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमार्फत पर्यटन कर वसूल केला जाईल. हा कर संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवासी, ५ वर्षांखालील पर्यटक मुले, जि.प. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. ग्रामपंचायतींनी वसूल केलेला कर हा जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीत जमा केला जाणार असून, प्राप्त करापैकी २५ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींना, तर उर्वरित ७५ टक्के रकमेतून पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनाही द्यावा लागेल कर
यासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके म्हणाले की, पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी गेलेल्या जि.प.व्यतिरिक्त अन्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही पर्यटक कर द्यावा लागेल. प्रौढ पर्यटकांना ५ रुपये, तर ६ ते १२ वयोगटातील मुलांना ३ रुपये कर आकारला जाणार आहे. शैक्षणिक सहलीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये बऱ्यापैकी सूट देण्यात आली असून, विद्यार्थ्यांकडून अवघा १ रुपया कर घेतला जाईल.