पर्यटन राजधानीत पर्यटन स्थळे बंद, गेल्या २ वर्षांत पुरातत्व विभागाला २० कोटी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 02:14 PM2022-01-24T14:14:51+5:302022-01-24T14:15:30+5:30
अनिश्चिततेने घसरतोय विदेशी पर्यटकांचा आलेख
- योगेश पायघन
औरंगाबाद : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (एएसआय) अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद लेणींसह बीबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांना तिकीट आकारले जाते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे पर्यटनस्थळे कधी बंद तर कधी सुरू या अनिश्चिततेने एएसआयला तिकिटातून मिळणाऱ्या महसुलात तब्बल २० कोटी रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणींसह औरंगाबाद लेणी, दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा पाहण्यासाठी वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांत २०१६ पासून विदेशी पर्यटकांच्या संख्येत कमालीची घसरण झाली आहे. २०१६ मध्ये चारही पर्यटनस्थळांवर विदेशी पर्यटकांच्या ८५ हजार तिकिटांची विक्री झाली होती. ती घटून २०२०-२१ मध्ये केवळ १९६ तर डिसेंबर २०२१ पर्यंत केवळ ८७३ वर पोहोचली. सुमारे अडीच कोटींचा महसूल या पर्यटकांकडून वर्षाकाठी मिळतो, तो पाच लाखांपेक्षाही कमी झाला आहे.
सहा महिन्यांत दुप्पट पर्यटक
जिल्ह्यात ११ मार्च २०२१ रोजी पर्यटनस्थळे बंद झाली. १६ जून २०२१ रोजी सुरू झाली. तेव्हापासून डिसेंबरअखेरपर्यंत सहा महिन्यांत भारतीय ६ लाख ५७ हजार ८ तर केवळ ८७३ विदेशी पर्यटकांची तिकीट विक्री झाली. दिवाळी, नाताळाच्या सुट्यांत पर्यटनस्थळे गजबजली होती. तोच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने १० जानेवारीपासून पुन्हा पर्यटनस्थळे बंद झाली.
४ केंद्रांवर तिकीट विक्रीतून मिळालेला महसूल :
वर्ष - भारतीय - विदेशी - एकूण रुपये २०१६-१७ -७,०५,४६,५७५ -३,७३,९६,२०० -१०,७९,४२,७७५
२०१७-१८ -७,५०,६७,९२० -२,७३,९५,२०० -१०,२४,६३,१२०
२०१८-१९ -९,०३६३,५७५ -२,०५,३४,२१५ -११,०८,९७,७९०
२०१९-२० -९,२१,३२,९३० -२,५८,१५,३७० -११,७९,४८,३००
२०२०-२१ -१,१६,८७,७०० -९८,०९५ -१,१७,८५,७९५
२०२१-२२ -२,१६,६८,९२० -४,२९,४८० -२,२०,९८,४००