अजिंठा-वेरूळसह पर्यटनस्थळे बंद; प्रशासनाच्या तुघलकी कारभाराने पर्यटन जगतातून तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 02:24 PM2021-03-12T14:24:39+5:302021-03-12T14:27:22+5:30
अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले.
औरंगाबाद : अंशत: लॉकडाऊनदरम्यान पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक स्मारकेही बंद ठेवण्याचा तुघलकी निर्णय शहर प्रशासनाने एका रात्रीतून घेतल्यामुळे दि. ११ रोजी पर्यटन स्थळी आलेल्या पर्यटकांना आणि त्यांना तिथे घेऊन आलेल्या पर्यटन व्यावसायिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एका रात्रीतून निर्णय फिरविण्याची ही कोणती तुघलकी तऱ्हा आहे, असे म्हणत पर्यटन जगताकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले. एवढ्या लांबचा प्रवास करून आलो आणि येथे येऊन मोठा टाळा बघावा लागला, असे म्हणत पर्यटकांनी महाराष्ट्र शासन आणि औरंगाबाद शहर प्रशासन यांच्या अजब कारभारावर प्रचंड तोंडसुख घेतले. अंशत: लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ७ रोजी पहिला अध्यादेश काढला होता. यामध्ये लॉकडाऊन काळात पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक स्मारके याबाबत कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे शनिवार-रविवारचा कडक लॉकडाऊन वगळता अन्य दिवशी पर्यटन स्थळे नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असा पर्यटन व्यावसायिकांचा अंदाज होता. त्यामुळे पर्यटकांना तशी आगाऊ सूचना देऊन शनिवार- रविवारचे बुकिंग रद्द करण्यात आले होते. परंतु अचानक दि. १० रोजी रात्री शहर प्रशासनाकडून आदेश काढण्यात आला आणि दि. ११ पासून औरंगाबाद शहर व परिसरातील सर्व पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्मारके बंद करण्यात आली. यामुळे आता येणाऱ्या पर्यटकांना कसे तोंड द्यावे, असा प्रश्न गाइड आणि पर्यटन व्यावसायिकांना पडला आहे.
माझ्यासोबत आलेले संजीव सेठी नोएडा येथून आले होते. तिकीट काढायला गेल्यावर आम्हाला अजिंठा लेणी बंद असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे अनेक पर्यटकांना परत जावे लागले. गाइड, टॅक्सीवाले, फेरीवाले, हॉटेल आम्ही सगळे पर्यटनावर अवलंबून आहोत. अजिंठा लेणी पाहायला दररोज १०० पर्यटकही येत नाही. लेणी परिसर एवढा विस्तीर्ण आहे की साेशल डिस्टन्सिंग पुरेपूर पाळले जाते, असे असताना पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही काय खावे आणि कुटुंबाला कसे पोसावे, याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावे. जर प्रशासन आम्हाला प्रत्येकाला १० हजार रुपये महिना आणि वर्षभराचे रेशन देत असेल तर तुम्ही वर्षभर पर्यटन स्थळे बंद ठेवा. आमची काही हरकत नाही. अन्यथा तुमच्या या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे, अशी भूमिका अजिंठा येथील गाइड अबरार यांच्यासह अन्य व्यावसायिकांनी घेतली आहे.