बीबी-का-मकबरा परिसरातील उत्खननात सापडलेला खजिना येणार पाहता
By संतोष हिरेमठ | Published: March 19, 2024 01:01 PM2024-03-19T13:01:53+5:302024-03-19T13:04:29+5:30
बीबी का मकबरा परिसरात उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू पर्यटक, इतिहासप्रेमींना न्याहाळता येणार
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरात झालेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तू आणि रचना सापडल्या. पर्यटक आणि इतिहासप्रेमींमध्ये या सगळ्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जमिनीखालील हा ऐतिहासिक खजिना पर्यटक, इतिहासप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरापासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे. ज्या ठिकाणी हे उत्खनन सुरू आहे, ती जागा काहीशी उंच आहे. गेली अनेक वर्षे त्यावर मातीचे ढिगारे टाकण्यात आलेले होते. उत्खननात हे मातीचे ढिगारे हटविण्यात आले आणि त्यानंतर एक - एक रचना समोर येत गेली. ही जागा पाहता येईल का, अशी विचारणा पर्यटक आणि इतिहासप्रेमींकडून होत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने घेतला आहे. उत्खननाचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते संवर्धनाचे काम झाल्यानंतर ही जागा पर्यटक, इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे.
शेकडो छायाचित्रांत होणार कैद
उत्खननाच्या जागेतील प्रत्येक भागाचे छायाचित्र काढण्यात येणार आहे. त्यातून ही जागा शेकडो छायाचित्रांमध्ये कैद होणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे सहायक अधीक्षण पुरातत्त्वविद डाॅ. प्रशांत सोनोने यांच्या देखरेखीखाली हे उत्खनन होत आहे.
परवानगी आवश्यक
उत्खनन होणाऱ्या ठिकाणी पर्यटक भेट देऊ शकतील. परंतु, त्यासाठी उत्खनन करणाऱ्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिवकुमार भगत यांनी सांगितले.
उत्खननाच्या ठिकाणी नेमके काय पाहता येईल?
- मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, दगडी, चुन्याचे बांधकाम असलेल्या शौचालयाचा पाया.
- पाणी निचरा करण्यासाठी केलेले बांधकाम. दगडाने झाकलेली नाली.
- ‘मेहराब’युक्त (भिंतीतील एक कोनाडा, कपार) छोटी संरचना.
- दगडाचा पाया, त्यावर विटांची भिंत.
- मातीच्या ढिगाऱ्याने बंद असलेला एक दरवाजा.
- एक कारंजे, कमानाकृती विटांची रचना.
- चुन्यापासून तयार केलेली फरशी.