खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया
By संतोष हिरेमठ | Published: November 17, 2023 08:13 PM2023-11-17T20:13:51+5:302023-11-17T20:15:49+5:30
अजिंठा लेणी परिसरात पर्यटक संतप्त; छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंत १६ ठिकाणी खड्डेमय, ६ ठिकाणी एकेरी रस्ता
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणींचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांचा रस्ता आणि रांगेतच सर्वाधिक वेळ जात असल्याची परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंत जवळपास १६ ठिकाणी खड्डेमय, तर ६ ठिकाणी एकेरी रस्ता आहे. अशा रस्त्यातून कसाबसा मार्ग काढून लेणी गाठल्यानंतर पार्किंग, बस, लेणीसाठी तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यास येथील अनेक समस्यांमुळे मनस्ताप करून घेण्याची वेळ पाहुण्यांवर ओढावत आहे.
इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे (आयटो) चार दिवसीय ३८ वे कन्व्हेन्शन (राष्ट्रीय अधिवेशन) २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान शहरात पार पडले. परिषदेनंतर टूर ऑपरेटर्सनी अजिंठा, वेरुळ लेणीसह पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर तेथील परिस्थितींविषयी संघटनेला ‘फिडबॅक’ दिला. त्यातील अनेक बाबी चिंताजनक आहे. या स्थितीकडे लक्ष देऊन पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सने (आयटो) केली. परंतु दीड महिन्यांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याची परिस्थिती आहे.
असा होतो मनस्ताप
छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच आहेत, तर कुठे रस्ता एकेरी आहे. अजिंठा लेणीत पर्यटकांना पर्यावरण आणि स्थानिक सुविधा वापरण्यासाठी, पार्किंग, बस आणि लेण्यांना भेट देण्यासाठी अशाप्रकारे ४ वेळा पैसे मोजावे लागतात. हे सर्व एका तिकिटात एकत्रित करण्याच्या मागणीकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे रहावे लागते. लेणीत जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या खिळखिळ्या बसमधून प्रवास करावा लागतो.
लेणीत काही ठिकाणी वारंवार पादत्राणे काढावी लागतात. त्यामुळे हातात बूट घेऊन पर्यटकांना वावरावे लागते. अजिंठा लेणीत वस्तू खरेदी करण्यासाठी फेरीवाले मागे लागतात. त्याचा पर्यटकांना त्रास होतो. एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या किमती सांगितल्या जातात.
पर्यटन सचिवांना पुन्हा पत्र देणार
टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले, पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. अजिंठा लेणीला जाताना आणि लेणीत पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. येथील प्रश्नांसंदर्भात पर्यटन मंत्रालयाच्या सचिवांना पुन्हा एकदा पत्र दिले जाईल.