पर्यटकांनो हे लक्षात असू द्या; २२ ते २४ जानेवारीला अजिंठ्यातील दोन लेण्या बंद असतील
By योगेश पायघन | Published: January 21, 2023 04:03 PM2023-01-21T16:03:30+5:302023-01-21T16:05:01+5:30
दोन्ही लेण्यात चित्र संवर्धनासाठी ‘फ्युमिगेशन’ करण्यात येणार
औरंगाबाद : अजिंठा लेणीत चित्रांचे संवर्धन करण्यासाठी लेणी क्रमांक १६ आणि १७ मध्ये ‘फ्युमिगेशन’ करण्यात येणार आहे. त्यामुळे या लेण्या पर्यटकांसाठी २२, २३, २४ जानेवारी रोजी बंद असतील. २५ जानेवारीपासून या लेण्या पर्यटकांना पाहता येतील.
किडे, सूक्ष्म जिवांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येतात. अजिंठा शाखेच्या रसायनशास्त्र शाखेतर्फे २२ ते २४ जानेवारीदरम्यान लेणी क्रमांक १६ आणि १७ मध्ये इफाॅक्साईड वायू सोडण्यात येणार आहे. फ्युमिगेशननंतर ३६ तास लेणी हवाबंद ठेवावी लागते. त्यामुळे या तीन दिवसांत पर्यटकांना या लेण्या बघता येणार नाहीत. हे काम उपअधीक्षक डाॅ. एस. विनोद कुमार, अखिलेश भदोरिया, अनुपमा महाजन, नीलेश महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १ आणि २ क्रमांकाच्या लेणीचे काम करण्यात आले होते.
काय आहे लेणी क्र.१६ आणि क्र. १७ मध्ये
लेणी क्र.१६
या लेणीत गौतम बुद्धाच्या जीवनातील घटना येथे दाखविण्यात आल्या आहेत. येथील कथकली नृत्याची चित्रे उल्लेखनीय आहेत. आतमध्ये बुद्धांची भव्य मूर्ती आहे. तसेच परलम्बापर मुद्रा, हत्ती, घोडे, मगर यांचीही चित्रे येथे कोरलेली आहेत. छतावरही सुंदर चित्रकला आढळते.
लेणी क्र. १७
या लेणीत देखील बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत. आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेणीत आहे. पूर्वजन्मी बुद्ध अनेक सोंडांचा हत्ती असल्याचे चित्रही येथे दिसते. येथील छतावर परीकथा चित्रित केल्या आहेत.