बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच

By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2022 07:29 PM2022-11-23T19:29:41+5:302022-11-23T19:29:54+5:30

अवघ्या १० मिनिटांचे अंतर, तरीही ‘बीबी का मकबरा’ पाहणाऱ्या ९० टक्के पर्यटकांची लेण्यांकडे पाठ

Tourists who say 'Wow Taj...' after seeing Bibi-ka-Maqbara are far away from Aurangabad caves | बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच

बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘बीबी का मकबरा’ पाहून पर्यटकांच्या मुखातून आपसूकच ‘वाह ताज...!’ असे शब्द बाहेर पडतात, मात्र बीबी का मकबरा पाहणारे जवळपास ९० टक्के पर्यटक अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावरील औरंगाबाद लेण्यांकडे जातच नसल्याची परिस्थिती आहे. अजिंठा, वेरूळ लेण्यांप्रमाणेच औरंगाबाद लेणीची माहितीही देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

पर्यटनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ‘मस्ट सी’ म्हणजे ‘आवर्जून बघावीत’ असे ऑनलाइन पोर्टल बनविले. भारतात आल्यावर पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी, अशा पर्यटनस्थळांची यादी पोर्टलवर देण्यात आली. यात औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबीका मकबरा आणि औरंगाबादची लेणी यांचा त्यात समावेश आहे. बीबी का मकबरा येथे ऑक्टोबर महिन्यात एक लाखावर पर्यटकांनी भेट दिली; मात्र येथूनच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील औरंगाबाद लेण्यांना ऑक्टोबरमध्ये केवळ १० हजार ६४ पर्यटकांनी भेट दिली. पुरेशा प्रमाणात माहितीच पोहोचत नसल्याने प्राचीन पर्यटन स्थळापासून पर्यटक वंचित राहत असल्याचे चित्र आहे. पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात असल्याचे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सांगतात. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यासाठी यापुढे आणखी प्रयत्नांची गरज आहे, असेही इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासकांनी म्हटले.

पर्यटकांपर्यंत माहिती पोहोचविण्याची गरज
औरंगाबादेतही लेणी आहेत, हे अनेक पर्यटकांना माहीतच नसते. बीबी का मकबरा पाहणारे काही पर्यटकच औरंगाबाद लेणी पाहतात. विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बीबी का मकबरा येथे औरंगाबाद लेण्यांसंदर्भात व्यापक स्वरूपात माहिती देण्याची सुविधा केली पाहिजे. दर्शनी भागात फलक लावले पाहिजेत. औरंगाबाद लेण्यांकडे पर्यटकांना आकर्षित केले पाहिजे.
- डाॅ. कामाजी डक, पुरातत्त्व अभ्यासक

बीबी का मकबरा येथे भेट देणारे पर्यटक
महिना- भारतीय पर्यटक-परदेशी पर्यटक
एप्रिल-४८,१४७-१३७
मे-१,०३,३२९-११९
जून-९५,१४८-१५९
जुलै-८२,३९८-१६६
ऑगस्ट-६४,७६२-१२२
सप्टेंबर-७०,२६९-३०७
ऑक्टोबर-१,०७,०२८-३४५
एकूण-५,७१,०८१-१३५५

औरंगाबाद लेणी येथे भेट देणारे पर्यटक
महिना- भारतीय पर्यटक-परदेशी पर्यटक
एप्रिल-५,०७३-६
मे-७,२७६-९
जून-८,९६१-१३
जुलै-१५,५११-२१
ऑगस्ट-८,१४९-२३
सप्टेंबर-९,०२७-३९
ऑक्टोबर-१०,०६४-४६
एकूण-६४,०६१-१५७

Web Title: Tourists who say 'Wow Taj...' after seeing Bibi-ka-Maqbara are far away from Aurangabad caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.