खाम, सुखना नदीच्या पाण्यावर विषारी शेती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:48 PM2019-03-18T23:48:18+5:302019-03-18T23:55:28+5:30
खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते.
औरंगाबाद : खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते. भूमिगत गटार योजनेमुळे तर अनेक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाल्यासारखे झाले आहे. महापालिकेने आतापर्यंत दोन वेळेस कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक वेळी शेतकºयांच्या विरोधाला प्रशासनास सामोरे जावे लागले.
बाजारात हिरव्या भाज्या दिसल्या की कोणीही सुखावतो. या पालेभाज्या दूषित पाण्यावर उगविण्यात आल्या असतील, अशी शंकाही आपल्या मनात येत नाही. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराबाहेर बाराही महिने हिरवीगार दिसणारी शेती नाल्याच्या दूषित पाण्यावर बहरत आहे. या भाज्यांमध्ये शिसे, पारा, जस्त, तांबे, फिनेल, रंग, धुण्याचा सोडा, अमोनियम, फ्लोराईड आणि कोबाल्टसारख्या जड धातूंचा शिरकाव असतो. या पालेभाज्या खाल्ल्यावर तात्काळ परिणाम दिसत नसला तरी भविष्यात यामुळे किडनी, यकृताचे विकार, अर्धांगवायू, लिव्हर सोरायसिस यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. या भाज्या खाल्ल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता असते. शहरातील खाम नदीत (नाला) सोडल्या जाणाºया १३ पेक्षा अधिक नाल्यांच्या या प्रदूषित पाण्यावर नदीकाठचे शेतकरी पालेभाज्या आणि विविध पिके घेत आहेत. नाल्यांमधून नदीमध्ये औद्योगिक व नागरी वसाहतींमधील सांडपाणी जात असल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. या पाण्यात जड धातूसोबतच मानवी विष्ठाही जाते. जड धातू व मानवी विष्ठेतील विषाणू या भाज्यांमध्ये जातात.
कोणत्या भागात सर्वाधिक शेती
सुखना नदीपात्रातील शेतीवर चिकलठाणा, हर्सूल, जाधववाडी, मिसारवाडी, पॉवरलूम आदी भागात मोठ्या प्रमाणात शेती होते. खाम नदीच्या पात्रातील पाण्यावर छावणी लोखंडी पुलापासून वाळूजच्या वळदगावपर्यंत हजारो एकर शेती करण्यात येते. या दूषित पाण्याच्या शेतीवर कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही शासकीय यंत्रणेने दाखविले नाही.
भूमिगत गटार योजना संजीवनी
महापालिकेने ३५० कोटी रुपये खर्च करून शहराच्या चारही बाजूंनी भूमिगत गटार योजनेचे काम केले आहे. शहराबाहेरील मोठ्या ड्रेनेजलाईनमधून किमान ९० ते १०० एमएलडी पाणी वाहत असते. नक्षत्रवाडी भागात या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. मागील दोन वर्षांपासून अनेक शेतकरी भूमिगत गटार योजनेच्या चेम्बरमधून पाणी चोरी करीत आहेत. मनपाने दोन वेळेस मोटारी जप्त केल्या. त्याचा कोणताच परिणाम शेतकºयांवर झाला नाही.