टोयटा-किर्लोस्कर मोटर्सला छत्रपती संभाजीनगरमध्ये ८२७ एकर जमीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:58 PM2024-10-07T19:58:40+5:302024-10-07T20:02:30+5:30
इलेक्ट्रिक, हायब्रिड कार्सचे होणार उत्पादन, ऑरिक सिटीने दिले अलॉटमेंट लेटर
छत्रपती संभाजीनगर : चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टाेयटो- किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७ ) बिडकीन डीएमआयसीमध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या मागणीनुसार सोमवारी ऑरिक सिटीने कंपनीला ८२७ एकर जमीन अलॉटमेंटलेटर पाठवले. यामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
टॉयोटा किर्लोस्कर मोटर यांना सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जमीन मंजूर करण्यात आली. टीकेएमने ३१ जुलै रोजी राज्य सरकारसोबत करार केला होता. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून एक ग्रीनफिल्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी स्थापन करण्यात आली आहे, जी विशेष उद्देश वाहन (SPV) महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (MITL) मार्फत विकसित होत आहे. शेंद्रा आणि बिडकीन या नोड्स विकसित होत आहेत."
२१ हजार कोटींची गुंतवणूक
टीकेएम कंपनी या प्रकल्पासाठी २१ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, लवकरच काम सुरु होणार असल्याची माहिती आहे. या प्रकल्पामधून जानेवारी २०२६ पासून उत्पादन अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रात ८ हजार थेट आणि १८ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितले होते की, या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी ४ लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्सचे उत्पादन होईल. या प्रकल्पासाठी २१ हजार कोटींची गुंतवणूक होईल. तसेच, या प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती होईल, असेही त्यांनी नमूद केले.