विलंब शोधण्यासाठी आता ‘ट्रॅकरशीट’
By Admin | Published: November 15, 2014 11:41 PM2014-11-15T23:41:32+5:302014-11-15T23:55:13+5:30
प्रसाद आर्वीकर, परभणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मजुरांची मजुरी ठराविक कालावधीत वितरित करणे बंधनकारक आहे़
प्रसाद आर्वीकर, परभणी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मजुरांची मजुरी ठराविक कालावधीत वितरित करणे बंधनकारक आहे़ मजुरी वाटपात होणाऱ्या विलंबावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने आता ‘ट्रॅकरशीट’ काढले असून, या ट्रॅकरशीटच्या माध्यमातून नेमका विलंब कोठे होतो हे शोधण्यास मदत मिळणार आहे़
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते़ काम दिल्यानंतर मजुरांची मजुरी ठराविक कालावधीमध्ये त्यांना मिळणे बंधनकारक आहे़ जिल्ह्यात या योजनेंतर्गत सर्व मजुरांना आॅनलाईन मजुरी वाटप होते़ परंतु, असे असतानाही बऱ्याच वेळा मजुरी वाटप करण्यास विलंब लागतो़ मजुरी वितरित करण्याचे तीन-चार टप्पे आहेत़ प्रत्येक टप्प्यावर संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत आॅनलाईन फाईल्स तयार होतात़ त्यामुळे मजुरी वितरित करताना नेमका विलंब कुठे झाला हे लक्षात येणे अवघड जात होते व शासनाला नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागत होती़ राज्यातील सर्वच जिल्ह्यात ही समस्या होती़ स्थानिक पातळीवर वेगवेगळे प्रयोगही या संदर्भात झाले आहेत़ परंतु, आता मात्र शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी एक परिपत्रक काढून ट्रॅकरशीट तयार केली आहे़ त्यामुळे नेमका विलंब कुठे झाला याचे स्पष्टीकरण मिळणार आहे़ तसेच मजुरांच्या मजुरी वितरणातही आणखी पारदर्शकता येणार आहे़