कॅरिबॅगच्या कारवाईस व्यापाऱ्यांचा विरोध
By Admin | Published: July 20, 2016 12:06 AM2016-07-20T00:06:54+5:302016-07-20T00:31:23+5:30
औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा
औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे पथक अंगुरीबाग येथे पोहोचल्यावर परिसरातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. २०० पेक्षा अधिक नागरिक-व्यापाऱ्यांच्या जमावाने मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मनपातर्फे रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
शासनाने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. या पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. शहरातील विविध नाल्यांमध्येही कमी जाडीच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी शहरात कॅरिबॅगमुक्तीसाठी जोरदार मोहीम सुरू केली.
शहरात कॅरिबॅग विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मागील सहा ते सात महिन्यांपासून मनपाच्या घनकचरा विभागातर्फे ही कारवाई सुरू आहे.
मंगळवारी सायंकाळी मनपाचे पथक अंगुरीबाग येथील कॅरिबॅग विकणाऱ्या दुकानदारांची झाडाझडती सुरू केली. यावेळी अचानक व्यापारी एकत्र झाले. त्यांनी मनपाच्या पथकाला पिटाळून लावले. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मनपाने कारवाईला तूर्त पूर्णविराम दिला. नंतर घनकचरा विभागप्रमुख शिवाजी झनझन यांनी सिटीचौक ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली.