व्यापाऱ्यांनी दुपारी ४ वाजेनंतर केली दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:26+5:302021-06-09T04:05:26+5:30
औरंगाबाद : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने नागरिक सुखावले. शहराचे ठप्प झालेले ...
औरंगाबाद : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने नागरिक सुखावले. शहराचे ठप्प झालेले अर्थचक्र सुरू झाल्याने व्यापार्यांतही उत्साह दिसून आला. वेळेच्या बाबतीत काही व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्यामुळे त्यांनी दुपारी चार वाजता तर काहींनी सात वाजता दुकाने बंद केली. प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील अर्थकारण पुन्हा ठप्प झाले होते. मात्र राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनलॉक करताना औरंगाबाद शहराचा समावेश श्रेणी-१ मध्ये केला. त्यामुळे तब्बल ८७ दिवसांनी सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच शहर पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले. शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने, पर्यटनस्थळे सर्व काही खुले झाले. व्यापारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारपेठा सुरू होताच पहिल्याच दिवशी सकाळपासून खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. दुकाने, विविध प्रकारचे व्यवसाय सुरू झाल्याने व्यापारी वर्गदेखील सुखावलेला दिसून आला. शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, सराफा बाजार, सिटी चौक परिसर, टीव्ही सेंटर, शहानूरमिया दर्गा, मुकुंदवाडी मार्केट, उस्मानपुरा, छावणी, रेल्वेस्टेशन या भागातील बाजारपेठ ग्राहकांनी फुललेली दिसून आली. जुन्या मोंढ्यात विविध प्रकारच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. काही व्यापारी संभ्रमात असून, त्यांनी दुपारी चार आणि सायंकाळी सात वाजता दुकाने बंद केली.
नागरिकांकडून कोराेनाच्या नियमांचे पालन नाही
शहरातील प्रमुख बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र बाजारपेठेत वावरणार्यांपैकी काही नागरिक बेपर्वाई करत विनामास्क दिसून आले. कोरोनाच्या नियमांचे पालन नागरिकांकडून होताना दिसून येत नाही.