राज्य जीएसटीच्या झाडाझडतीने व्यापारी हैरान
By | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:34+5:302020-11-28T04:05:34+5:30
औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी वसुली निम्म्याने घटल्याने कर चुकवेगिरीच्या संशयावरून राज्य जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांची ...
औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी वसुली निम्म्याने घटल्याने कर चुकवेगिरीच्या संशयावरून राज्य जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे.
आर्थिक वर्ष एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान राज्य जीएसटी विभागात १०४० कोटी २४ लाख रुपये महसूल जमा झाला होता. यंदा एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत ५२६ कोटी १२ लाख रुपये महसूल जमा झाला. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यंदा सरकारी तिजोरीत ४९.४२ टक्के कमी महसूल जमा झाला आहे. यामुळे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी जीएसटी विभागाने कारवाईला सुरुवात केली. दिवाळी आधी राज्य जीएसटी विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयाने शहरातील व जालन्यातील ८ व दिवाळी नंतर शहरातील ४ अशा १२ दुकानाची तपासणी केली.
कोरोनामुळे २४ मार्च ते ४ जूनपर्यंत लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला. त्यातून सावरत आता व्यवहाराची गाडी रुळावर येत असताना जीएसटी विभागाने कारवाई सुरू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिल मिसमॅच होणे, उधारी वेळेवर वसूल न होणे आदी कारणामुळे अनेक व्यापारी जीएसटी भरण्याची इच्छा असतानाही तो वेळेवर भरू शकले नाही. असे अनेक कारण व्यापाऱ्यांनी सांगितले. जीएसटीच्या कारवाईमुळे प्रामाणिक व्यापारीही भरडले जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
दिवाळी आधी ४ किराणा दुकानदार, २ सुकामेवा व मसाला दुकानदार, मसाला १ व होजियारी १ दुकान व २ दिवसाआधी शहरतील ३ तंबाखू होलसेल दुकानात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील एकूण माल खरेदी, विक्री, उधारी खाते, बँक खाते आदींची तपासणी करण्यात आली व बिल ताब्यात घेण्यात आले. औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
( जोड)