वाहतुकीचा खेळखंडोबा; व्यापारी फुटपाथवर, ग्राहकांची वाहने रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 02:42 PM2020-11-25T14:42:49+5:302020-11-25T14:45:38+5:30
या अनुदानातून तीन वर्षांपूर्वी महापालिकेने चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अनुदानातून महापालिकेने सिडको एन -६ चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत ३ कोटी ५२ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार केला. या रस्त्यावर नागरिकांना पायी चालण्यासाठीसुद्धा जागा भेटत नाही हे विशेष. फुटपाथ व्यापाऱ्यांनी गायब केले. व्यापाऱ्यांच्या ग्राहकांची वाहने आता रस्त्यावर राजरोसपणे लागत आहेत. या सर्व परिस्थितीकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस डोळेझाक करीत आहेत.
शहरातील रस्ते दर्जेदार आणि सिमेंटकाँक्रीटचे तयार व्हावेत म्हणून मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाने महापालिकेला तब्बल २७६ कोटी रुपये दिले. या अनुदानातून तीन वर्षांपूर्वी महापालिकेने चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. २४ मीटर रुंद रस्त्यावर महापालिकेने १५ मीटरपर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट रस्ता तयार केला. ७.५ मीटर एका बाजूने काम करण्यात आले. चिश्तिया चौकापासून थेट बजरंग चौकापर्यंत रस्त्याचा वापर कुठे ८ फूट तर कुठे ६ फूट एवढाच होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहने सिमेंट रस्त्यावर उभी असतात. पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
नागरिकांच्या हक्काचे फुटपाथ गायब
महापालिकेने १५ मीटर रुंद सिमेंट रस्ता केला. दोन्ही बाजूने चार-चार मीटर जागा फुटपाथसाठी सोडण्यात आली. ही जागा आता महापालिकेच्या नकाशावरच दिसते. या भागातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे.
साडेतीन कोटी रुपये खर्च तरी कशाला केले?
चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत रस्त्याचा वापर एक वाहन जाईल एवढाच होतो आहे. महापालिकेने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ता तरी कशासाठी केला असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत रस्ता :
- खर्च ३ कोटी ५२ लाख
- रस्त्याची लांबी १ किलोमीटर
- रस्त्याची रुंदी ७.५ मीटर