धिंगाणा ‘तिनं’ घातलाय ना...; मद्यधुंद महिलेच्या भांडणाने उड्डाणपुलावर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 06:11 PM2018-12-28T18:11:01+5:302018-12-28T18:18:33+5:30
सिडकोतील उड्डाणपुलावर दारूच्या नशेतील महिला एका व्यक्तीसोबत भांडत गदारोळ करीत होती.
औरंगाबाद : एका मद्यधुंद महिलेने एका व्यक्तीसोबत भांडण झाल्यानंतर सिडकोतील वीर सावरकर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री गोंधळ घातला. पकडण्यासाठी आलेल्या महिलापोलिसांना ती पुलावरून उडी मारून आत्महत्येची धमकी देत होती. पोलिसांनी कौशल्याने तिला ताब्यात घेतले आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. तेथेही तिने पोलिसांसोबत हुज्जत घालून आरडाओरड केली. हा प्रकार पाहून धावती वाहने थांबल्याने पुलावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
सिडकोतील उड्डाणपुलावर दारूच्या नशेतील महिला एका व्यक्तीसोबत भांडत गदारोळ करीत होती. पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री सात वाजता ही माहिती कुणीतरी कळविली. गस्तीवरील सिडको पोलीस, एमआयडीसी सिडको पोलीस आणि नंतर दामिनी पथक तेथे दाखल झाले. पोलिसांना पाहून त्या महिलेने माझ्या गळ्यातील सोन्याचे गंठण पडले, मी उड्डाणपुलावरून उडी मारते़़, असे जोराने ओरडत एक पाय पुलाच्या कठड्यावर ठेवू लागली. मला कोणीही पकडू नका, असे ती ओरडत होती. दामिनी पथकाच्या पोलिसांनी बोलण्यात गुंतवून तिला पकडले. त्याच वेळी महिलेची मुलगी मोपेड घेऊन तेथे आली. ‘आमचा घरगुती वाद आहे, माझ्या आईला पकडू नका,’ असे ती ओरडून पोलिसांना सांगत होती.
पोलिसांनी मुलीला एका गाडीत तर मद्यधुंद महिलेला दुसऱ्या गाडीत बसवून थेट एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. माय-लेकींनी महिला पोलिसांसोबत हुज्जत घातली. यामुळे पुलावर वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी झाली.
सिडको ठाण्यातही गोंधळ
एमआयडीसी सिडको ठाण्यात नेल्यानंतर त्या महिलेने तेथेही आरडाओरड करीत गदारोळ केला. महिला पोलिसांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. या घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याविषयी ठाण्यात नोंद झाली नव्हती.