‘चक्का जाम’मुळे वाहतूक ठप्प
By Admin | Published: January 31, 2017 11:15 PM2017-01-31T23:15:49+5:302017-01-31T23:32:36+5:30
लातूर :मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लातूर शहरातील पाच नंबर चौक, गरुड चौक, रेणापूर नाका, बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक या प्रमुख पाच चौकांतून शहरात व शहराबाहेर जाणारी वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे ठप्प झाली होती. रुग्णवाहिकांना मात्र कार्यकर्त्यांनी स्वत:हून रस्ता मोकळा करून दिला. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत आंदोलन चालू होते. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस बसस्थानकातून सोडण्यात आली नाही.
रस्त्यावर दुचाकी आडव्या लावून रस्ते ब्लॉक केले होते. लातूर शहरातून मुरुड, कळंब, अंबाजोगाई, नांदेड, औसा या मुख्य रस्त्यांकडे जाणारे सर्व रस्ते चक्का जाम आंदोलनामुळे ब्लॉक करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. रिंग रोडवर अवजड वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राजीव गांधी चौक ते पाच नंबर चौक या रिंग रोडवर अवजड वाहनांच्या रांगा होत्या. तिकडे नांदेड रोडवरही गरुड चौकाच्या पुढे अवजड वाहनांना दुपारी ३ वाजेपर्यंत थांबावे लागले. शहरातील पाच नंबर चौक, गरुड चौक, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, रेणापूर नाका चौकात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. ‘जय भवानी, जय शिवराय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)