महामार्गावर तब्बल दीड तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:23 AM2018-02-10T00:23:44+5:302018-02-10T00:23:50+5:30
औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा ते चौक्यापर्यंत शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गणोरी फाट्यानजीक झाड तोडताना रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद होऊन सुमारे दीड तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. याचा प्रवाशांना ताटकळत थांबून त्रास सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा ते चौक्यापर्यंत शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गणोरी फाट्यानजीक झाड तोडताना रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद होऊन सुमारे दीड तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. याचा प्रवाशांना ताटकळत थांबून त्रास सहन करावा लागला.
औरंगाबाद -जळगाव महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या दोन्ही बाजूंची ५० वर्षे जुनी झाडे तोडल्या जात आहेत. रस्ता चौपदरीकरण करण्याला आणखी अधिकृत मंजुरी मिळाली नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. पण झाडे तोडण्याचा सपाटा सुरूच आहे. संबंधित झाडे तोडण्याचा ठेका ज्यांना देण्यात आला, त्यांच्याकडे झाडे तोडण्याचे मोठे साधन नाही.
रस्त्यावर झाड पडले तर त्याला तात्काळ हटविण्याची यंत्रणा नाही, अशा परिस्थितीत झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली कशी, असा प्रश्न पडत आहे. या प्रकाराची चौकशी करणे आवश्यक झाले आहे.
शुक्रवारी सकाळी सुमारे तीन कि. मी. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात दोन रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या.
फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी करमाडला गेले होते. त्यांना वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाली असता ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वाहतूक ठप्प प्रकरणात अडकलेल्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. झाडे तोडताना याची माहिती पोलिसांना देण्यात येत नाही. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्यावर पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहचत नाहीत.
च्ठेकेदारांना यापूर्वी अनेक वेळा पोलिसांनी सूचना दिल्या पण ते पोलिसांना जुमानत नाही. शिवाय त्यांच्याकडे यंत्रणा नसल्याने झाड रस्त्यावरून बाजूला हटविताना वेळ लागतो. या काळात वाहनधारक कंटाळून जातात.