तब्बल तीन तास वाहतूक ठप्प
By Admin | Published: May 12, 2017 12:25 AM2017-05-12T00:25:02+5:302017-05-12T00:29:14+5:30
मंठा : म्हशींची वाहतूक करणार टेंपो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टेंपो चालक जागीच ठार झाला तर ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : म्हशींची वाहतूक करणार टेंपो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टेंपो चालक जागीच ठार झाला तर ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मंठा- जालना मार्गावरील आखणी फाटा येथे घडली. या अपघातात तीन म्हशीही दगावल्या असल्याची माहिती आहे.
मंठ्यावरून जालना शहराकडे म्हशी घेऊन येत असलेला टेंपो आणि जालना शहराकडून मंठ्याकडे जात असलेल्या ट्रकची आखणी पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. तर आयशरचा चालक सुध्दा स्टेअरींग मध्ये अडकून गंभीर जखमी झाला. समोरासमोर दोन्ही वाहने एकमेकांवर जोरात आदळल्याने मेटॅडोरमधील १२ म्हशी रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यात तीन म्हशी जागीच ठार झाल्या तर उर्वरित तीन म्हशी गंभीर जखमी असल्याचे पोलीस सांगत आहेत. अपघात झाल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील बरबडा, वाटूर, केंदळी, आकणी आदी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
ट्रक चालक स्टेअरींगमध्ये अडकल्याने त्याला ग्रामस्थांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ मंठा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी येऊन जेसीबीच्या मदतीने दोन्ही वाहने वेगळी केली. यातील गंभीर आयशरच्या चालकास बाहेर काढले. सदर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले होते. त्याला तातडीने मंठा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तीन तास वाहतूक ठप्प
अपघात झाल्यावर दोन्ही वाहने एकमेकांत फसली. त्यामुळे वाहने जाण्यास मार्र्गच नव्हता. परिणामी तब्बल तीन तास या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलिसांना सूचना देऊनही पोलीस अर्धा तासानंतर आली, परंतु रस्त्यावरून वाहने काढण्यासाठी वेळ लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.