ट्रक उलटल्याने छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गावर वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:56 PM2023-07-12T15:56:21+5:302023-07-12T15:57:17+5:30
पुलाजवळच ट्रक आडवा झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गावर आज सकाळी ९ वाजता बिल्ड गावानजीक फुलंब्रीकडे जाणारा एक मालवाहक ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. ट्रक महामार्गावर आडवा झाल्यामुळे तब्बल तीन तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक वाहने अडकून पडून प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे. ठेकेदाराकडून संथगतीने काम केले जात असल्याने मार्गावर वाहतूक कोंडीच्या घटना सातत्याने होतात. दरम्यान, मठपाटी समोर पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी माती मिश्रित मुरूम टाकल्याने पाऊस पडल्यानंतर चिखल होतो. आज सकाळी ९ वाजता येथेच छत्रपती संभाजीनगरकडून फुलंब्रीकडे येणारा ट्रक ( एच आर 65ए 5283) उलटला. ट्रकमध्ये कापसाच्या रुईचे गठान भरलेले होते. ते खाली कोसळले.
छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडवर बिल्डगावानजीक पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प. pic.twitter.com/nHvSLgeNXW
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 12, 2023
पुलाजवळच ट्रक आडवा झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. तब्बल दीडतासानंतर पोलीस घटनास्थळी आले. मात्र, ट्रक बाजूला करण्यात उशीर झाल्याने शेकडो वाहने अडकून पडली. तब्बल तीन तासानंतर पोलिसांनी ट्रक बाजूला करत वाहतूक कोंडी फोडली.