वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी सिद्धार्थ उद्यानात ‘ट्रॅफिक पार्क’
By Admin | Published: June 13, 2014 01:09 AM2014-06-13T01:09:45+5:302014-06-13T01:13:09+5:30
विजय सरवदे , औरंगाबाद हे शहर संवेदनशील म्हणून बोलले जाते. काही असामाजिक तत्त्वे या शहरात धार्मिक तणाव व सामाजिक तेढ निर्माण करतात, अशीही या शहराची प्रतिमा बनवली जाते;
विजय सरवदे , औरंगाबाद
हे शहर संवेदनशील म्हणून बोलले जाते. काही असामाजिक तत्त्वे या शहरात धार्मिक तणाव व सामाजिक तेढ निर्माण करतात, अशीही या शहराची प्रतिमा बनवली जाते; पण या शहरातील नागरिक समंजस आहेत, असा विश्वास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच लोकसभेच्या निवडणुका यशस्वी पार पडल्या. सर्वसामान्य नागरिक व पोलीस यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत, ठाण्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असून सिद्धार्थ उद्यानात लवकरच ‘ट्रॅफि क पार्क’ सुरू केला जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
प्रश्न : सुरुवातीला थोडा वेगळा प्रश्न. पोलीस खात्यात करिअर करायचे असा सुरुवातीपासून आपला विचार होता की अपघाताने हे क्षेत्र निवडले?
उत्तर : जाणीवपूर्वक हे क्षेत्र निवडले. १९८९ च्या ‘आयपीएस’ बॅचमध्ये मी उत्तीर्ण झालो. समाजसेवेसाठी यासारखे दुसरे क्षेत्र नाही. पोलीस खात्याच्या माध्यमातून दबलेल्या, पिचलेल्या समाजाचे प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली. गुन्हेगारीच्या माध्यमातून समाजात हतबलता निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचाही प्रयत्न आहे.
प्रश्न : आपणास पोलीस खात्यात नोकरी करण्याचा २४-२५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. औरंगाबादेतील सामाजिक, धार्मिक सलोख्याबाबत आपण काय सांगाल.
उत्तर : हे शहर संवेदनशील म्हणून चर्चेत आहे; पण मला तसे वाटत नाही. मी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येथे रुजू झालो. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून नियोजन केले. धार्मिक, राजकीय, समाजातील प्रतिष्ठित लोक , तसेच शांतता समिती सदस्यांच्या बैठका घेतल्या. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आवाहन केले. लोकांच्या मनात असलेले समज, गैरसमज, दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केला. आमच्या अधिकाऱ्यांनी शहरात हिस्ट्रीसिटर, तडीपार व अन्य गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविले. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला आणि निवडणुका शांततेत पार पडल्या.
प्रश्न : रस्त्यावर असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे मोठे आव्हान तुमच्या समोर होते.
उत्तर : ते आव्हान तर होतेच. धार्मिक स्थळे हटविल्यानंतर तणाव निर्माण होईल, अशी आम्हाला भीती होतीच; पण लोकांना विश्वासात घेऊन त्यांना भूमिका पटवून सांगितली. शहरातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आवाहन केले.
प्रश्न : सर्वसामान्य नागरिकांना आजही पोलीस हे आपले मित्र वाटत नाहीत. त्या दृष्टीने आपले कोणते प्रयत्न राहतील?
उत्तर : पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात बराच मोठा बदल झालेला आहे. अलीकडे शासनाचा दंडक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धाकामुळे पोलिसांचे वर्तन सुधारले आहे. पोलिसांचा नागरिकांसोबत जास्तीत जास्त फ्रेंडली अप्रोच आहे. ठाण्यांमध्ये तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांचे पोलिसांनी तात्काळ समाधान केले पाहिजे. ठाण्यात दखल घेतली नाही, तर नागरिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडू शकतात. सर्व ठाण्यांमध्ये सकृत्दर्शनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले आहेत. एवढेच नाही तर आम्ही अधूनमधून डमी तक्रारदार पाठवून ठाण्यांमधील कारभाराची पडताळणी करीत असतो. मात्र, नागरिकांनी कायदेशीर तक्रारीसाठीच ठाण्यात आग्रह धरावा.
प्रश्न : तरीही ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून घेणे टाळले जाते?
उत्तर : आम्ही सर्व पोलीस ठाण्यांना किरकोळ तक्रारीही दाखल करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळेच मोबाईलची चोरी, जनावरांची चोरी, किरकोळ भांडणेही आता रेकॉर्डवर घेतली जातात.
प्रश्न : क्राईम रेट वाढू नये म्हणून ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करून घेत नाहीत?
उत्तर : असे होत नाही. जेवढ्या तक्रारी येतील. जे कोणी कायदेशीर तक्रारी दाखल करण्यासाठी येतील, त्या सर्वांच्या नोंदी करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत. क्राईम रेट वाढला तर वाढू द्या. आम्ही तो वाढू नये म्हणून नोंदी घेतल्या नाहीत, तर क्राईम थांबणार आहे का? गुन्हेगारांवर वचक ठेवायचा असेल, तर त्यांना रेकॉर्डवर आणलेच पाहिजे. समाजासमोर गुन्हेगारांचा पर्दाफाश केलाच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.
प्रश्न : अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबाद शहराचा क्राईम रेट किती आहे?
उत्तर : राज्यातील अन्य मोठ्या शहरांच्या तुलनेत औरंगाबादचे नाव क्राईम रेटमध्ये चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खाली आहे.
प्रश्न : न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फार कमी आहे?
उत्तर : पूर्वी काही वर्षांच्या तुलनेत आता शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासरी २२ टक्के एवढे हे प्रमाण आहे. आरोपी निर्दोष सुटला म्हणजे त्यास एकटा पोलीस जबाबदार राहत नाही. न्यायालयात प्रकरण सुरू असतानाच फिर्यादी व आरोपी बाहेरच प्रकरण मिटविण्यासाठी तडजोड करतात. अनेकदा साक्षीदार फितूर होतो. गुन्हा नोंदविण्यापासून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यापर्यंत पोलीस यंत्रणा परिश्रम घेते. पुढे मात्र तक्रारदार व आरोपींमध्ये आपसात तडजोडी होतात. किरकोळ प्रकरणात तडजोडीचे प्रमाण जास्त आहे. ल्लल्लल्ल
आयुक्तांचे आवाहन
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वर्षाकाठी सरासरी २ कोटी रुपयांचा दंड वसूल केला जातो. नागरिकांना माझे आवाहन आहे की, वाहतूक नियमांचे पालन करा. चालत्या वाहनांवरून मोबाईलवर बोलणे टाळा. सिग्नल तोडू नका. सीट बेल्टचा वापर करा. दंडापोटी भरली जाणारी रक्कम आपल्या मुलांसाठी खर्च करा. शहरात आवश्यक ठिकाणी सिग्नल व झेब्रा क्रॉसिंगसाठी मनपाला पत्र दिले आहे. लवकरच सिद्धार्थ उद्यानात ‘ट्रॅफिक पार्क’ उभारला जाईल. त्याद्वारे प्रामुख्याने विद्यार्थी व नागरिकांना वाहतूक नियम व सिग्नलविषयी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-राजेंद्र सिंह, पोलीस आयुक्त