अवैध प्रवासी वाहतूक झाली ‘सैराट’!

By Admin | Published: July 22, 2016 12:30 AM2016-07-22T00:30:57+5:302016-07-22T00:39:54+5:30

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मनमानी आहे. नंबरला लावलेले वाहन पंधरा प्रवासी बसविल्याशिवाय पुढे सरकत नाही. वाटेत मिळाले,

Traffic passenger gets 'sirat'! | अवैध प्रवासी वाहतूक झाली ‘सैराट’!

अवैध प्रवासी वाहतूक झाली ‘सैराट’!

googlenewsNext


अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मनमानी आहे. नंबरला लावलेले वाहन पंधरा प्रवासी बसविल्याशिवाय पुढे सरकत नाही. वाटेत मिळाले, तर आणखी प्रवासी पायऱ्यांवर उभे केले जातात. लातूर शहरात येणाऱ्या काळी-पिवळीमध्ये मेंढरे भरल्यागत माणसे कोंबलेली असतात. मात्र याकडे ना कोण्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे लक्ष जाते ना हद्दीतील ठाण्यांचे. व्यवस्थेचे अंकुश नसल्याने जिल्हाभरात अवैध प्रवासी वाहतूकदारांचा हैदोस सुरु असल्याचे गुरुवारी ‘लोकमत’ चमूने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जिल्हा व राज्य मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या ७० टक्के आहे. तीही भंगार वाहने. त्याचा विचार न करता जास्तीचे उत्पन्न मिळावे, यासाठी मोडकळीस आलेल्या वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक होत असल्याचे शहरातील ५ नंबर चौक, दयानंद गेट, राजीव गांधी चौक, बाभळगाव नाका, गरुड चौक, विवेकानंद चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड आदी भागांत आढळून आले. शहरातील विवेकानंद चौक व बाभळगाव नाका या भागांत पोलिस चौकीच्या शेजारीच बिनधास्तपणे जास्तीचे प्रवासी घेऊन अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. शहरातील औसा रोड भागात एमएच २४ बी ४६, राजीव गांधी चौकात एमएच २४ ई १९२६, बाभळगाव नाका एमएच २३ सी ०६०७, विवेकानंद चौक एमएच २४ एफ ९१४, शाहू चौकात एमएच २४ एफ ९५५, एमएच २४ एफ १४०५, रेणापूर नाका एमएच २४ एफ २३९५, एमएच २४ एबी ३५२५, नवीन रेणापूर नाका एमएच २४ एफ ८६७ या वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
औसा : शहरासह ग्रामीण भागात विविध वाहनांद्वारे होणाऱ्या वाहतुकीचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने वाहतुकीला ‘वैध’ वाहतुकीचे स्वरुप आणले आहे.
बस एखाद्या वेळेला आपली वेळ चुकवेल, पण अवैध वाहतूक करणारी वाहने मात्र वेळेवर येत असल्याने जीवाला धोका असला तरी नागरिकही त्याच वाहनांतून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. या वाहतुकीमुळे व इतर वाहनांच्या वाहतुकीमुळे अ‍ॅप्रोच रोडवर अपघाताची संख्या वाढली असल्याने हा रस्ता म्हणजे ‘मृत्यूचा सापळा’ बनला असल्याचे चित्र औसा तालुक्यातील स्टिंगमधून समोर आले आहे. तसेच पोलिस प्रशासन आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याचे आढळले.
रेणापूर : रेणापूर तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक वाढली असून, रेणापूर-पानगाव-लातूर या मार्गांवर काळी-पिवळी, टमटम या वाहनांनी अवैध प्रवासी वाहतुकीचा कहर केला असल्याचे दिसून आले. काळी-पिवळी एमएच २४ एफ ८६६ या वाहनांमध्ये पुढच्या सीटवर ४, मध्यभागी ५ प्रवासी तर मागील सीटवर ८ प्रवासी
४तर लोंबकळत ३ प्रवासी असे २ प्रवासी जीपमधून अवैधरित्या प्रवास करीत असल्याचे आढळून आले. या मार्गांवर तासाभराच्या निरीक्षणामध्ये ७ काळी-पिवळी, ९ टमटम अशी वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत असलेली आढळून आली. तर ही प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्लिनर अल्पवयीन असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, औसा, अहमदपूर, जळकोट, चाकूर, रेणापूर आदी तालुक्यांच्या ठिकाणी राजरोसपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यातच काही वाहनांवर अल्पवयीन मुले चालक असल्याचे आढळून आले अन् जीपमध्ये ११ प्रवाशांची मर्यादा असताना चक्क १५, १८ व २० या प्रमाणे लटकत प्रवासी नेत असल्याचे आढळून आले. परंतु, या वाहनाचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी अवैध प्रवासी वाहने व वाहतूक शाखा घेणार का? असा प्रश्नही प्रवाशांतून चर्चिला जात आहे. परंतु, याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध वाहनधारक सुसाट वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
चाकूर तालुक्याच्या सीमेलगत कल्लूरनजिक अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका जीपचा अपघात होऊन नऊ जण मृत्युमुखी पडले. अनेकजण जखमी झाले. तरीही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे. एमएच २४ एन ४१६, एमएच २४ व्ही ४९२, एमएच २४ एफ १४२४, एमएच २४ - ४९३९ ही वाहने अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळून आली. कल्लूरची घटना होऊन आठ दिवस झाले नाही तोवरच अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर पोलिस प्रशासनाचा वचक नसल्याने अवैध प्रवासी वाहनधारक बिनधास्त असल्याचे दिसून आले. परिणामी, नागरिकांना पैसे देऊनही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Traffic passenger gets 'sirat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.