रिक्षांविरोधात वाहतुक पोलिसांची मोहिम, ६१२ जणांवर दंडात्मक कारवाई
By राम शिनगारे | Published: November 17, 2022 09:43 PM2022-11-17T21:43:47+5:302022-11-17T21:44:36+5:30
सात रिक्षा ठाण्यात जमा : अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीनंतर कारवाईचा वेग
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीने छेड काढल्यानंतर धावत्या रिक्षातुन उडी घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजात त्याचे तिव्र पडसाद उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर वाहतुक पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मोहिम उघडली आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल ६१२ रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली. तर ७ चालकांचे रिक्षा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याची माहिती वाहतुक विभागाचे सहायक आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
वाहतुक पोलिसांनी पाचही विभागात नियमांचा भंग करणाऱ्या रिक्षाचालकाच्या विरोधात गुरुवारी सकाळपासूनच मोहिम सुरु केली होती. यात मिटर न बसविलेले रिक्षा, चालकाचा पोशाख परिधान न करणे, मान्यतेपेक्षा अधिक प्रवाशांना बसविणे, स्टॅण्डच्या बाहेर रिक्षा पार्क करणाऱ्या ६१२ चालकांना ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्याशिवाय दंड सहितेच्या २८३ कलमानुसार ७ ऑटो चालकांचे रिक्षा संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. यापुढेही नियमांचा भंग करणाऱ्या चालकांच्या विरोधात वाहतुक पोलीस अधिक मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही सहायक आयुक्त विशाल ढुमे यांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक मनोज बहुरे, जर्नादन साळुंके, सपोनि. नितीन कामे यांच्या पथकानी केली.
आयुक्तालयात रिक्षाचालकावर बैठक
पोलीस आयुक्तालयात वाहतुक विभागाच्या पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी रिक्षाचालकांसह मालकांची गुरुवारी बैठक घेतली. यामध्ये त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश चालकांसह मालकांना दिले आहेत. या बैठकीविषी मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.