सिग्नल यंत्रणा भेदून थेट प्लॅटफॉर्मवर धडकलेल्या रेल्वे इंजिनने चुकविला काळजाचा ठोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:10 PM2019-01-07T13:10:14+5:302019-01-07T13:19:11+5:30
हे इंजिन ८० कि.मी.च्या वेगाने सर्व सिग्नल यंत्रणा भेदून थेट रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबले
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : रेल्वे रुळावरून ८० कि.मी.च्या वेगाने धडधडत धावणारे रेल्वे इंजिन आवाज करीत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येऊन थांबल्याची काळजाचा ठोका चुकविणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली.
चिकलठाणाहून निघाल्यानंतर रेल्वे इंजिन सर्व सिग्नल यंत्रणा तोडून थेट औरंगाबाद स्टेशनवर धाडकन येऊन थांबले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ब्रेक नादुरुस्तीतून ही घटना घडल्याचे समजते; परंतु घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे इंजिन नादुरुस्त होण्याच्या घटना नवीन नाहीत. इंजिन नादुरुस्तीच्या घटनांमुळे वारंवार प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. नांदेड विभागातील रेल्वे जुन्या इंजिनवरच धावत असल्याची ओरड होते. या घटनेने रेल्वे अधिकाऱ्यांचा थरकाप उडाला. मालगाडीसाठी औरंगाबादला ४ जानेवारी रोजी कोडी येथून एक इंजिन दाखल होत होते. हे इंजिन चिकलठाणा रेल्वेस्टेशनपर्यंत सुरळीतपणे पोहोचले. त्यानंतर औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पोहोचेपर्यंत काहीतरी वेगळे घडेल, याची रेल्वे अधिकाऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.
चिकलठाणाहून येणारे रेल्वेचे इंजिन दुपारी ४ वाजेच्या सुमारास सर्व सिग्नल यंत्रणा भेदून थेट रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर खर्रर्र असा आवाज करीत येऊन थांबले. ८० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या इंजिनच्या या घटनेने एकच धावपळ झाली. क्षणभर रेल्वे अधिकाऱ्यांनाही कळले नाही की, नेमके काय झाले. कोणी म्हणत होते चालकाने सिग्नल यंत्रणेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इंजिन प्लॅटफॉर्मवर आणले. यासंदर्भात प्राथमिक चौकशी केली असता ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा प्रकार घडला. चालकाने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकशी सुरू आहे
या घटनेत रेल्वे इंजिनचे ब्रेक नादुरुस्त झाले होते, की अन्य काही कारण आहे, इंजिन चालक दोषी आहे का, याची दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर इंजिन औरंगाबादलाच ठेवण्यात आले, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या घटनेविषयी अधिक माहिती घेतली जाईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.