रेल्वेचा प्रवास 22 तासांचा, टेस्टिंगसाठी दीड तास, सोशल डिस्टन्सचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:11 PM2020-11-30T13:11:16+5:302020-11-30T13:17:03+5:30
सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांची तपासणी, अनेकांचे घेतले स्वॅब
औरंगाबाद : दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशनवर आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. तब्बल २२ तासांचा प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना दीड तास रांगेत ताटकळावे लागत आहे. सोशल डिस्टन्सचेही पालन होत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. शिवाय इतर रेल्वेंतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नसल्याने कोरोना वाढीचा धोका नाकारता येत नाही.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करून काही मार्गांवर रेल्वे सेवा केंद्र शासनाने सुरू केली होती. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता दररोज अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. सचखंड एक्स्प्रेससह सध्या मुंबई आणि हैदराबादसाठी विशेष रेल्वे धावत आहे; परंतु केवळ सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यातून कोरोनाबाधितांचा आकडा समोर येत आहे.
रेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधा
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दिल्ली येथून सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेकडून पथक नेमण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची माहिती नोंदविल्यानंतर रेल्वे स्टेशनवर तैनात केलेल्या पथकाकडून तपासणीसाठी नाकातील नमुना घेतला जातो. त्यानंतर प्रवासी रवाना होतात. अहवालाची माहिती प्रवाशांना नंतर कळविली जाते.
टेस्टिंगसाठी लागतो वेळ
टेस्टिंगसाठी प्रवाशांना जवळपास दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तपासणीसाठी केवळ एकच पथक राहिले तर हा वेळ आणखी वाढतो. शिवाय तपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. प्रवासी रांगेत अगदी एकमेकांच्या जवळ उभे असतात. त्याकडे कोणाचे लक्ष जाताना दिसत नाही. त्यातूनही कोरोनाचे आमंत्रण मिळू शकते.
झांसीहून औरंगाबादला कामासाठी आलो आहे. रेल्वे आल्यानंतर इथे तपासणी होणार असल्याचे कळाले. त्यासाठी रांगेत उभा राहिलो. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर माझा नंबर आला आणि तपासणीसाठी नमुना घेण्यात आला.
-अमनाथ गुप्ता, प्रवासी
मथुराहून आलो आहे. तपासणीसाठी एक तास रांगेत उभे राहावे लागले. एक तास रांगेत गेला; परंतु तपासणी होणे अधिक गरजेचे आहे. प्रशासन जे काम करीत आहे, ते योग्यच वाटते.
-विशाल सिंह, प्रवासी