रेल्वेस्थानक झाले चकाचक
By Admin | Published: June 19, 2014 12:36 AM2014-06-19T00:36:53+5:302014-06-19T00:51:48+5:30
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेले औरंगाबादचे रेल्वेस्थानक बुधवारी गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत अधिक चकचकीत दिसले.
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेले औरंगाबादचे रेल्वेस्थानक बुधवारी गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत अधिक चकचकीत दिसले. नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा यांचा दौरा असल्यामुळे स्थानकाच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले गेले. स्थानक आणि परिसरात ते पाहणी करीत असतानाही स्वच्छतेचे काम सुरूच होते.
रेल्वेस्थानक आणि परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शर्मा यांचा हा दौरा होता. त्यांनी स्वच्छतेच्या कामांची प्राधान्याने पाहणी करीत अस्वच्छतेबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. १० वाजता शर्मा यांनी स्वच्छता आणि सोयी-सुविधांची पाहणी सुरू केली. जवळपास तीन तास ते पाहणी करीत होते. शर्मा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कॅन्टीन, वेटिंग रूम, स्वच्छतागृह, मालधक्का, पार्किंग, लिफ्ट आदींची पाहणी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. मालधक्क्यावर ट्रक उभे करण्यासाठी पुरेशी जागा आहे का, याविषयी माहिती घेतली. प्लॅटफॉर्मवर तुटलेल्या फरशा, स्टाईल्स आदी बाबींविषयी त्यांनी सूचना केल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील बंद असलेले स्वच्छतागृह सुरू करण्याचीही सूचना त्यांनी केली. यावेळी रेल्वेस्थानक व्यवस्थापक अशोक निकम, सहायक मंडल अभियंता डी. चंद्रमोहन आदी अधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आढावा
इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) सहकार्याने मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम केले जाणार आहे. अद्ययावत सोयी-सुविधांबरोबर पर्यटकांना केंद्रबिंदू ठेवून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वेस्थानकाची उभारणी केली जाणार आहे. १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या कामाच्या नियोजनाविषयी शर्मा यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मागणीनुसार प्रस्ताव
आगामी अर्थसंकल्पात जनतेच्या मागणीनुसार प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत लवकरच सीसीटीव्ही क ॅमेरे बसविण्यात येणार असून, ते काम प्रगतिपथावर आहे. घोषित करण्यात आलेली औरंगाबाद- रेनीगुंटा गाडी सुरू करण्याचा मार्ग आगामी अर्थसंकल्पानंतर मोकळा होईल, असे पी.सी. शर्मा यांनी सांगितले.
पाहणीदरम्यानही स्वच्छता
अधिकाऱ्यांकडून स्थानकाची पाहणी सुरू असतानाही प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ, नाली यांची सफाई सुरू होती. नेहमीपेक्षा आज जास्त स्वच्छता होत असल्याने रेल्वेचे अधिकारी आले आहेत का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.
यावेळी वेटिंग रूममधील महिला प्रसाधनगृह स्वच्छ आहे की नाही याची पाहणी त्यांनी केली.
स्वच्छतेचे आवाहन
अस्वच्छतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी स्थानक आणि रेल्वेत स्वच्छता राहील, यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन पी.सी. शर्मा यांनी केले.