रेल्वे रुळावर आत्महत्येपासून रोखले, पण शेवटी काळरात्रीने ‘त्याला’ गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 06:30 PM2021-04-27T18:30:26+5:302021-04-27T18:32:48+5:30
रेल्वे रुळावर आलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे.
औरंगाबाद : रेल्वे रुळासमोर आत्महत्येसाठी आलेल्या एका व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी समजावून परत पाठविले. परंतु या व्यक्तीचा नंतर दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. या आजारपणामुळेच तो आत्महत्येसाठी आला होता, ही बाब जेव्हा समोर आली, तेव्हा आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या त्या जवानांनी ‘आम्ही त्याला वाचवले, पण शेवटी तो गेला’ असे म्हणत हळहळ व्यक्त केली.
रेल्वे रुळावर आलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. औरंगाबाद रेल्वे मार्गावर २०२० मध्ये ७० जणांनी आत्महत्या केली होती. यंदा गेल्या चार महिन्यांतच रेल्वे रुळावर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा निम्मी झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ३० जणांनी रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे रुळावर झालेल्या अपघाताची माहिती घेणे आणि रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाला करावे लागते. गेल्या काही दिवसांत रेल्वे रुळावर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वर्ष २०२० मध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे काही काळ रेल्वे सेवा बंद होती. यानंतरच्या काळात ही सेवा सुरळीत झाली. सध्या औरंगाबाद रेल्वे मार्गावर पॅसेंजर रेल्वे वगळता सर्व रेल्वे पूर्वीप्रमाणे धावत आहेत. या सगळ्यात गेल्या चारच महिन्यांत ३० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद रेल्वे सुरक्षा बलाकडे झाली आहे.
युवक, पुरुषांसह महिलांचीही आत्महत्या
युवक, पुरुषांसह महिलांनीही रेल्वेसमोर जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षी ७० आणि यावर्षी आतापर्यंत ३० जणांनी आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी दिली.