बहिणीची भेट घेऊन सुकेशिनी येरमे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:08 AM2017-07-31T01:08:13+5:302017-07-31T01:08:13+5:30
अमेरिकेत राहणारे काका आणि मावशीच्या घरातील रोख पाच लाख रुपये, २५ तोळ्यांचे दागिने, कार, मोपेड आणि घरातील फर्निचर घेऊन पसार झालेली शिकाऊ डॉक्टर सुकेशिनी येरमे हिच्या वडिलांचा पोलिसांनी जबाब नोंदविला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अमेरिकेत राहणारे काका आणि मावशीच्या घरातील रोख पाच लाख रुपये, २५ तोळ्यांचे दागिने, कार, मोपेड आणि घरातील फर्निचर घेऊन पसार झालेली शिकाऊ डॉक्टर सुकेशिनी येरमे हिच्या वडिलांचा पोलिसांनी जबाब नोंदविला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुकेशिनी पुणे विद्यापीठ परिसरात राहणाºया बहिणीला भेटल्यानंतर पसार झाली.
अमेरिकेत स्थायिक कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शिवाजी गुणाले यांच्या मालकीचा सिडको एन-४ येथे बंगला आहे. बालपणापासून त्यांच्याकडे राहणारी सुकेशिनी ही एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याने त्यांनी बंगला तिच्या ताब्यात दिला. राजू माटे हा वाहनचालकही त्यांच्या बंगल्यातच राहत होता. सुकेशिनी आणि राजू यांनी संगनमत करून डॉ. गुणाले यांची पत्नी वत्सला यांच्या नावे असलेला बंगला वर्षभरापूर्वीच बंब नावाच्या व्यक्तीला विकला. बंगल्याच्या रजिस्ट्रीच्या कागदपत्रांवर आणि विक्री करारनाम्यावर सह्या घेतल्या. बंगला विक्रीतून मिळालेले ६७ लाख रुपये त्यांनी हडपले. मात्र याची कोणतीही खबर त्यांनी डॉॅ. शिवाजी आणि वत्सला यांना लागू दिली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी बंगला रिकामा केला आणि बंगल्यातील फर्निचरसह संपूर्ण सामान, कार, मोपेडसह सुकेशिनी आणि वाहनचालक राजू पसार झाले. या प्रकरणी २६ जुलै रोजी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.