औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:04 PM2018-03-23T14:04:36+5:302018-03-23T14:09:14+5:30
तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला.
औरंगाबाद : तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. हे प्रशिक्षण मुंबईतील भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सांभाळलेली आहे. त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर, सिडको, छावणी आणि वाळूज या चार डिव्हिजनअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक कार्यरत असून, सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम करीत आहेत.
वाहतूक विभागात सुमारे २५० पोलीस कर्मचारी आहेत. या सर्व वाहतूक पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांना मूलभूत वाहतूक नियमन कसे करावे, वाहतूक नियमनासंदर्भात नव्याने आलेल्या आधुनिक उपकरणाचा वापर कसा करावा, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, स्पीड गण यासह अन्य उपकरणे कशी हाताळावीत, वाहनचालकांसोबतचे होणारे वाद टाळण्यासाठी कसे संभाषण करावे, यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान वाहतूक पोलिसांना भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. येथील कर्मचार्यांपैकी प्रत्येकी ५० कर्मचार्यांच्या पाच बॅच एकानंतर एक भायखळा येथे पाठविण्यात येणार आहेत. ५० कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर कर्मचार्यांचा निर्माण होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी मुख्यालयातील कर्मचार्यांची मदत घेतली जाईल, असे डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले.