दलालवाडीतील पूल उभारणीचे त्रांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:03 AM2021-07-10T04:03:27+5:302021-07-10T04:03:27+5:30
औरंगाबाद : शहरातील अत्यंत गजबजलेल्या गोमटेश मार्केट भागातील दलालवाडी येथील पुलाचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम ...
औरंगाबाद : शहरातील अत्यंत गजबजलेल्या गोमटेश मार्केट भागातील दलालवाडी येथील पुलाचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम संथगतीने होत असल्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. या भागात ग्राहक फिरकतच नाहीत. पूल उभारणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राज्य शासनाने शहरातील रस्ते, पूल उभारणीसाठी १५२ कोटी रुपये मंजूर केले. रस्ते विकास महामंडळाकडे गोमटेश मार्केट येथील रस्ता, पूल उभारणीचे काम देण्यात आले. कंत्राटदाराने अर्धवट रस्त्याचे काम केले. पूल उभारणीचे काम एक वर्षापासून सुरू आहे. खोदकामामुळे परिसरातील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील व्यापारीही त्रस्त झाले आहेत. खोदकामामुळे ग्राहक येण्याचा प्रश्नच नाही. दोन महिन्यांपूर्वी जेसीबीच्या साहाय्याने जुना पूल, भिंती पाडण्यात आल्या. पुलाच्या एका बाजूची जुनी, मोळकळीस आलेली भिंत तशीच ठेवली आहे. डागडुजी करून भिंत तशीच ठेवली जाणार आहे. आता याच भिंतीवर सुमारे ५० मीटर लांबीच्या व १५ मीटर रुंदीच्या या पुलाच्या एका बाजूचा भार राहणार आहे. त्यामुळे पूल सुरक्षित राहणार नाही, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. यासंदर्भात नागरिकांनी कंत्राटदाराला जाबही विचारला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या कामाकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. ज्या पद्धतीने जुना पूल पूर्णपणे पाडून नवीन तयार करण्याचे काम सिटी चौक भागातील पंचकुंआ कब्रस्तानजवळ सुरू आहे. त्याच पद्धतीने काम करावे, अशी मागणी जोर धरत आहे.