महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:24 PM2020-12-17T12:24:16+5:302020-12-17T12:25:05+5:30
मागील वर्षभरात प्रशासकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरबदल केले नव्हते हे विशेष.
औरंगाबाद : महापालिकेत राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने वर्षानुवर्ष एकाच टेबलवर काम करणाऱ्या तब्बल २२ कर्मचाऱ्यांची प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी बुधवारी बदली केली. मागील वर्षभरात प्रशासकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरबदल केले नव्हते हे विशेष.
कनिष्ठ अभियंत्यांपैकी प्रभाग ८ मधील कृष्णा दौड यांना प्रभाग १ मध्ये कर निर्धारण व कर संकलन विभागात अतिरिक्त काम पहावे लागेल. बी.एम. कानकाटे यांना प्रभाग १ मधून प्रभाग ९, एम.आर. राजपूत व दुय्यम आवेक्षक आर.एम. सुरासे यांची प्रभाग २ मधून अतिक्रमण विभागात बदली केली आहे. जी.व्ही. भांगे यांना नगररचना विभागासोबतच प्रभाग ६ चा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. दुय्यम आवेक्षक एच. आर. राचतवार यांना अतिक्रमण विभागासोबतच प्रभाग ८ चे अतिरिक्त काम दिले आहे. सारंग विधाते यांना प्रभाग ९ मधून प्रभाग ५ मध्ये हलवले आहे. तर भरत देवकर यांना प्रभाग २ मधून ३ मध्ये हलवले आहे. अनुरेखक नंदकुमार विसपुते यांना प्रभाग ५ मधून ७ तर मजहर अली यांना अतिक्रमण विभागासोबत प्रभाग ४ ची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.
मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्यांना धक्का
दुसऱ्या कार्यालयीन आदेशानुसार आयुक्तांनी पालिका मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या १२ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रभागांच्या ठिकाणी बदल्या केल्या. आजपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली त्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या होता. मात्र आता प्रशासकीय राज असल्याने त्यांची उचलबांगडी झाली. यात प्रामुख्याने उपमहापौर कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रशांत शहापूरकर यांची प्रभाग ७ मध्ये बदली केली आहे. बी. डी. फटाले यांना स्थानिक संस्था कर विभागासोबतच प्रभाग ३ चे अतिरिक्त काम दिले आहे. प्रभाग ६ मधील प्रशांत देशपांडे यांना मालमत्ता विभागाचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. महेश नगरकर आस्थापना-१ विभागातून विधी विभाग, ललित सूर्यवंशी कोविड वॉररूममधून उपायुक्त दालन, कनिष्ठ लिपिकांमध्ये अशोक भोजने लेखा परीक्षण विभागातून प्रभाग २, दत्तात्रय केणेकर शहर अभियंता विभागातून प्रभाग ७, नितीन खोकले कोविड वॉररूमधून कर आकारणी विभाग, कृष्णा ठोकळ प्रभाग ८ मधून कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, टंकलेखक अनिरूद्ध पाटील शहर अभियंता विभागातून कोविड वॉररूम, मिर्झा अकबर बेग क्रीडा विभागातून प्रभाग ७, अजिम खान खडकेश्वर वाचनालयातून प्रभाग ५ याप्रमाणे या बदल्या करण्यात आल्या आहेत.