कोरोना वाढत असताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:00 PM2021-03-20T17:00:14+5:302021-03-20T17:03:27+5:30
अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतांनाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या कोरोना काळात गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तिकडे होत असल्याने या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या होत आहेत. अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतांनाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या कोरोना काळात गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.
अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २० दिवसांत ६०० पेक्षा जास्त रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात अंबाजोगाईसह परळी, धारूर, केज, माजलगाव येथील रुग्णांची उपचाराची सोय याच रुग्णालयात आहे. अंबाजोगाईत असणारे कोविड रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झालेले आहे. याच रुग्णांना उपचारासाठी डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. एकनाथ शेळके, बधिरीकरण शास्त्र डॉ. प्रसाद सुळे तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. सदानंद कांबळे या तिघांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे.
यांच्या प्रतिनियुक्तीसाठी जळगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कारण वैद्यकीय प्रशासनने दिले आहे. यापूर्वीही ३४ डॉक्टरांच्या बदल्या मुंबई येथे करण्यात आल्या होत्या. त्याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर झाला होता. त्यावेळी या डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयाच्या दारात ठिय्या मांडून धरणे आंदोलन केल्याने त्या डॉक्टरांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या. आता पुन्हा तीन डॉक्टरांच्या बदल्याचा प्रश्न पुढे आला आहे. या डॉक्टरंच्या प्रतिनियुक्तीमुळे रुग्णालयात रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार आहे.
डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा - आ. नमिता मुंदडा
अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉ. एकनाथ शेळके, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. सदानंद कांबळे यांच्या जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर होणाºया बदल्या रद्द कराव्यात असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिले आहे. अंबाजोागईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे