संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून २२५ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:46 AM2022-09-12T11:46:17+5:302022-09-12T11:46:48+5:30
काश्मीरच्या निशांत शालीमार, हरियाणातील पिंजोर उद्यानाप्रमाणे फलोद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे विविध रंगी कारंजे आणि सूरतालावर नृत्य करणारे म्युझिकल फाउंटन या उद्यानाचे वैशिष्ट्ये आहेत
औरंगाबाद : पैठण येथील भकास झालेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे. उद्यानात वॉटर पार्क, वाहनतळ, ॲम्पी थिएटर उभारणे, वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रकल्प, सोलार पॅनल बसवून विजेचा प्रश्न मार्गी लावणे, योगा सेंटर, लायब्ररी आणि हिस्ट्री म्युझियम,बास्केट बॉल कोर्ट, टेनिस बॉल कोर्ट, क्रिकेट टर्फ, अम्युझमेन्ट पार्क, ॲक्वॅरियम, सीसीटीव्ही, रोप वे बसविणे, ई-बाइक असा सुमारे २२५ कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला निधी देण्याची घोषणा उद्या मुख्यमंत्र्यांकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऐतिहासिक वारसा असलेल्या पैठण हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. संत एकनाथ महाराजांचे गाव आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव हे पैठणपासून अवघ्या काही किलोमीटरवर आहे. येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी १९७५मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यानाचे भूमिपूजन झाले आणि १९८६पासून हे उद्यान पर्यटकांसाठी खुले झाले. ३१० हेक्टरवर हे उद्यान विकसित केले आहे. काश्मीरच्या निशांत शालीमार, हरियाणातील पिंजोर उद्यानाप्रमाणे फलोद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे विविध रंगी कारंजे आणि सूरतालावर नृत्य करणारे म्युझिकल फाउंटन या उद्यानाचे वैशिष्ट्ये आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाला मरणकळा आली. उद्यानाचा विकास करावा, यासाठी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींची मागणी होती. गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील या उद्यानाचा कायापालट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विविध जणांनी सादरीकरण केले होते, मात्र हा प्रस्ताव मार्गी लागला नव्हता. सुमारे २२५ कोटी रुपये खर्च या उद्यानाच्या पुनरुज्जीवनासह तेथे अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
दरम्यान, शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर या उद्यानाचा विषय रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी लावून धरला. यानंतर १८ ऑगस्ट रोजी उद्यानाच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या (पीएमसी) नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा भरण्याची मुदत दि. २ सप्टेंबरपर्यंत होती.
मुख्यमंत्र्यांकडून पैठणकरांना अपेक्षा
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार पैठण येथे होणार आहे. या जाहीरसभेत मुख्यमंत्री संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी प्रस्तावित निधीच्या मंजुरीची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे या सूत्रांनी सांगितले.