कष्टकऱ्यांच्या वसाहतीचा कायापालट; उस्मानपुरा, मिलिंदनगर, एकनाथ नगरात आता टुमदार घरे
By साहेबराव हिवराळे | Published: April 11, 2024 06:58 PM2024-04-11T18:58:47+5:302024-04-11T18:59:17+5:30
एक दिवस एक वसाहत: शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने रोज मजुरी करणाऱ्यांनीही आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी मजूर व कष्टकऱ्यांच्या समजल्या जाणाऱ्या उस्मानपुरा, कबीरनगर, मिलिंदनगर, एकनाथनगर, द्वारकापुरी, तुळशी हाउसिंग सोसायटी, नागसेननगरात पुढील पिढीने डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सरकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारली असून तिसरी पिढी बँकिंग, काॅर्पोरेट सेक्टर, तसेच उद्योजकतेकडे वळलेली दिसत आहे. झोपड्यांच्या जागी टुमदार दुमजली घरे उभारली गेली आहेत. तरीही येथे काही नागरी समस्या आहेतच.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने रोज मजुरी करणाऱ्यांनीही आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला. परिसराच्या लगत शालेय शिक्षणापासून ते तांत्रिक शिक्षणाची ज्ञानमंदिरे आहेत. बहुतांश पाल्य उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. आई-वडिलांनी सहन केलेले काबाडकष्ट पाहून शिक्षण घेऊन स्मार्ट वर्क करण्याकडे येथील विद्यार्थ्यांचा कल दिसत आहे.
संरक्षण कुंपण हवे
नवीन कबीरनगरच्या रस्त्याचे काम रखडलेले असल्याने रस्ता उखडलेलाच असून, नागरिकांना औद्योगिक वसाहतीत जाणे अडचणीचे ठरत आहे. समाज कल्याण विभागाकडून अभ्यासिका तसेच बुद्ध विहाराचे मोठे काम सुरू असून , मोकळ्या मैदानांना संरक्षक कुंपण उभारण्याची गरज आहे.
- दीपक निकाळजे
पाण्याची अशुद्धता वाढल्याने आरोग्यास धोका
परिसरात सध्या थंडीताप तसेच अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विकार, गालफुगी इ. आजार सुरू आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. औषध फवारणी करणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी धूर व औषध फवारणी करून डास निर्मूलन करावे.
- डॉ. एस.पी. मोहिते
लोंबकळलेल्या तारा अन् उघडी डीपी
वीजपुरवठा सुरळीत असला किंवा नसला तरी अनेक गल्लीत लोंबकळणाऱ्या विजेच्या धोकादायक तारा दिसत आहेत. ट्रान्सफार्मर रस्त्याच्या कडेस असल्याने दुर्घटनेची भीती आहे. कारण मोकळ्या मैदानावर मुले खेळतात. महावितरणने येथे डीपी का उघडी ठेवलेली आहे, असा प्रश्न पडतो.
- अल्लाउद्दीन कुरेशी
बहुतांश मुले उद्योग व्यवसायाकडे...
व्यावसायिक शिक्षणामुळे मजुरी करण्याऐवजी स्वत:चे उद्योग व्यवसाय काढण्याकडे लक्ष केंद्रित केल्याने नवी पिढी उद्योगाकडे वळली. इतरांना रोजगार कसा देता येईल, असा विचार आताची पिढी करीत असल्याने त्याचा परिणाम दिसत असून उस्मानपुरा, मिलिंदनगर, फुलेनगर, एकनाथनगर, द्वारकापुरी इ. भागांतील राहणीमान देखील बदलू लागले आहे.
- अनिल रगडे