घाटीतील सोनोग्राफी यंत्रासह स्त्रीरोग ओपीडीचे स्थलांतर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 07:00 PM2018-06-12T19:00:54+5:302018-06-12T19:03:20+5:30
घाटीतील सर्जिकल इमारतीमधील वॉर्ड क्र. ११ समोरचे तीन सोनोग्राफी यंत्र हे बाह्यरुग्ण विभागाच्या १०८ क्रमांकाच्या दालनात, तर स्त्रीरोग ओपीडी कक्षही पहिल्या मजल्यावरील एआरटी केंद्राशेजारी स्थलांतरित करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीतील सर्जिकल इमारतीमधील वॉर्ड क्र. ११ समोरचे तीन सोनोग्राफी यंत्र हे बाह्यरुग्ण विभागाच्या १०८ क्रमांकाच्या दालनात, तर स्त्रीरोग ओपीडी कक्षही पहिल्या मजल्यावरील एआरटी केंद्राशेजारी स्थलांतरित करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एआरटी केंद्रासमोरील जागा पीटी सप्लाय व एमएलसी विभागाकडे आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील ही जागा स्त्रीरोग ओपीडीसाठी वापरण्यावर विचार सुरू होता. त्यानुषंगाने एमएससी विभाग कोबाल्ट इमारतीत १५ दिवसांपूर्वी स्थलांतरित करण्यात आला, तर पीटी सप्लाय हा जुन्या आयसीयूत हलवण्यासाठी सोमवारी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, पीटी सप्लायचे संजय व्यवहारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पांढरे यांनी पाहणी करून लवकरात लवकर हे स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या.
पीटी सप्लाय येथून काढल्यास स्त्रीरोग विभागासाठी तीन दालने रिकामी होणार आहेत, तर एक्स-रे व सोनोग्राफी हे एकाच ठिकाणी १०८ दालनात सुरू केल्याने क्ष-किरण विभागालाही सोयिस्कर होईल. त्यासाठी एक वेगळे गेट करण्यावरही विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती डॉ. येळीकर यांनी दिली. वॉर्ड ११ इमर्जन्सी वॉर्ड करण्यात आला असून राखीव लिथोट्रीप्सी वॉर्ड स्पायनल वॉर्ड करण्याचे कार्यालयीन आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी काढले आहेत.