वाहतूक बेटाचे झाले जाहिरात बेट; सानिया डिस्ट्रिब्युटर्सचा असाही प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:49 PM2018-08-04T13:49:02+5:302018-08-04T13:51:04+5:30

सेव्हन हिल येथील वाहतूक बेटाला सानिया डिस्ट्रिब्युटर्सने जाहिरात बेटच करून टाकले आहे. यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 

Transport Island became Ad Island; Sania Distributors' mischievous work | वाहतूक बेटाचे झाले जाहिरात बेट; सानिया डिस्ट्रिब्युटर्सचा असाही प्रताप

वाहतूक बेटाचे झाले जाहिरात बेट; सानिया डिस्ट्रिब्युटर्सचा असाही प्रताप

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील चौकाचे र्सौदर्यीकरण, त्या चौैकात विविध रंगीबेरंगी फुलांची झाडे पाहून सर्वांचे मन प्रसन्न व्हावे. या ऐतिहासिक नगरीच्या सौैंदर्यात त्यामुळे भर पडावी, यासाठी महानगरपालिकेने वाहतूक बेटे विकसित करण्यासाठी उद्योजक, व्यापारी, विविध संस्थांना दत्तक दिली. मात्र, सेव्हन हिल येथील वाहतूक बेटाला सानिया डिस्ट्रिब्युटर्सने जाहिरात बेटच करून टाकले आहे. यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून १९९३ मध्ये कृष्णा भोगे यांनी काम पाहिले. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील चौक सुंदर व आकर्षक असावेत, अशी कल्पना त्यांना सुचली होती. त्यावेळेस काही प्रमुख चौैकात सौंदर्यीकरण करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. विविध प्रकारच्या मूर्ती उभ्या करून त्यांनी चौैकांचे सुशोभीकरण केले होते. त्यानंतर भोगे यांची बदली झाली आणि या सुशोभीकरण मोहिमेकडे मनपाचे दुर्लक्ष झाले. 

अर्थसंकल्पात तरतूद असतानाही चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात नव्हते. त्यामुळे चौैकातील मूर्तींचे विद्रुपीकरण झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कुणाल कुमार हे रुजू झाले. त्यांनी शहरातील चौकांच्या सुशोभीकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी उद्योजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्थांना वाहतूक बेटे विकसित करण्याचे आवाहन केले. यासाठी वाहतूक बेट दत्तक योजना सुरू करण्यात आली. चांगला प्रतिसादही मिळाला. वाहतूकबेट दत्तक देण्यासाठी ३८ मुद्दांची नियमावली तयार करण्यात आली. वाहतूक बेत दत्तक घेतलेल्या संस्थांनी तेथे वाहतूक बेटांच्या सौंदर्यीकरणासाठी फुलांची,शोभेची झाडे लावावी. तो परिसर सुशीभित करावा, याबद्दल त्यांनी प्रायोजक म्हणून त्या संस्थेचे नाव तिथे अटीशर्थीनुसार लिहिण्याची परवानगी देण्यात आली. 

तसेच मनपाला जाहिरात कर भरून त्या प्रायोजकाला जाहिरात करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, वाहतुकीचा बेटाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा बाजूला आणि सेव्हन हिल उड्डाणपुलाखालील सानिया डिस्ट्रिब्युटर्सने वाहतूक बेटाच्या चोहोबाजूने जाहिरातीचे १० स्टँड बॉक्स लावले आहेत. यामुळे आतमधील स्तंभ झाकोळला आहे.  महापालिकेने काही दिवसांपूर्वी बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली. सुमारे आठ हजारपेक्षा अधिक होर्डिंग काढून टाकले. सानिया डिस्ट्रिब्युटर्सने सौंदर्य बेटाच्या नावावर एकप्रकारे बेकायदा जाहिरात स्टँडबॉक्स उभे केले आहेत. यामुळे महापालिकेने हे स्टँड बॉक्सही हटविण्याची कारवाई केली पाहिजे, असे नागरिकांनी बोलून दाखविले. 

विकासकामांतर्गत लावलेली हिरवळ/ झाडांची देखभाल, मोसमी फुलांची वेळच्या वेळी व योग्य प्रकारे जोपासना व संपूर्ण परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संस्थेची असते. मात्र, येथे झाडांची नियमित देखभाल होत नसल्याने झाडे वाकडी-तिकडी वाढली आहेत. झाडांच्या कमी-जास्त उंचीमुळे  वाहनचालकांना पलीकडच्या रस्त्यावरून येणारी वाहतूकच दिसत नसल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत. प्रायोजकाने वाहतूक बेटाच्या सौैंदर्यीकरणाच्या नावाखाली त्याला जाहिरात बेटच करून टाकले, असा आरोप येथील निसर्गप्रेमी करीत आहेत. 

सौंदर्यीकरणाचे तीनतेरा
सानिया डिस्ट्रिब्युटर्सने सेव्हन हिल उड्डाणपुलाखालील वाहतूक बेटात स्टीलच्या साईड रिंगवर छोट्या पाट्या लावून जाहिरात केली आहे. याशिवाय मधील स्तंभाच्या चाहोबाजूने १० स्टँड बॉक्स लावून तिथेही जाहिरात केली आहे. स्टँड बॉक्सवर रेडियम लावण्यात आले आहे. रात्रीच्या वेळेस हे रेडियम चमकत असल्याने त्याचा त्रास होत असल्याचा आरोपही वाहनधारक करीत आहेत. याकडे महानगरपालिका डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले. वाहतूक बेट  सार्वजनिक मालमत्ता आहे ती खाजगी मालमत्ता नव्हे. यामुळे ती जागा ही सौंदर्य बेट आहे ती जाहिरातबाजीची जागा नव्हे. जाहिरातबाजी अधिक न होता तिथे वाहतूक बेटाचे सौंदर्य अबाधित राहावे, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.  

Web Title: Transport Island became Ad Island; Sania Distributors' mischievous work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.