परिवहन मंत्री वेळ देत नाहीत, ‘एसटी’ला हवे पूर्णवेळ अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 07:41 PM2021-09-29T19:41:24+5:302021-09-29T19:41:53+5:30
एसटीच्या राज्य शासनात विलीनीकरणाची मेळाव्यात मागणी
औरंगाबाद : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद सध्या परिवहन मंत्र्यांकडेच आहे. परंतु परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांना एसटीला वेळ देताच येत नाही. त्यांच्या कामाची व्याप्ती खूप आहे. त्यामुळे महामंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष द्यावेत किंवा राज्यमंत्र्यांना अध्यक्ष केले पाहिजे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे मंगळवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत म्हणाले.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचा मंगळवारी गांधी भवनात मेळावा झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बरगे म्हणाले, कोरोनामुळे प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. अनेक जुन्या बस भंगार झाल्या आहेत. ५ हजार एसटी खरेदीची गरज आहे, परंतु महामंडळ त्या खरेदी करू शकत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासन निधी देत आहे, परंतु ही तात्पुरती मलमपट्टी आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे वरिष्ठ कार्याध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दिलीपसिंह जगताप होते. मार्गदर्शक म्हणून जेम्स अंबिलढगे, चंद्रकांत काकडे, डी.ए. लिपणे, जगन्नाथ ढाकणे, वसंत बोराडे, बालाजी ढेपे, फैयाज पठाण, राजेंद्र वहाटुळे, चंदन राठोड, अजय देशमुख, कमलाकर पटवर्धन, संतोष जाधव, संदीप बोराडे, देवीदास जटाळे, हनुमंत वरवटे, वसंत पिल्ले, वाय. जी. चौहान, प्रमोद तांबे, सत्यनारायण शर्मा, सिद्धार्थ वंजारे, अर्चना जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
...तर ३ हजार कोटींची बचत
राज्य सरकारने एसटी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे. यामुळे विविध करापोटी दरवर्षी शासनाला द्यावी लागणारी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे हळूहळू एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, अशी मागणी श्रीरंग बरगे मेळाव्यात बोलताना केली.