मोठा दिलासा! खुलताबादेत ट्रामा केअर सेंटर मंजूर; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:02 PM2022-12-26T17:02:57+5:302022-12-26T17:04:47+5:30
आ. सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केली घोषणा
खुलताबाद - खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर मंजूर केल्याची घोषणा आज ( दि. २६ ) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत केली. या संदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.
खुलताबाद शहरालगतच सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग असून खुलताबाद तालुका हा जगप्रसिध्द वेरूळ लेणी तसेच धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे प्रसिध्द आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मागील पाच वर्षात तालुक्यात जवळपास एक हजार अपघात झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी ट्रामा केअर सेंटरची नितांत आवश्यता असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
याठिकाणी ट्रामा केअर सेंटर मंजूर व्हावे यासाठी आरोग्य विभागाने शासनस्तरावर तीन वेळेस प्रस्ताव पाठवला. मात्र तरी देखील आरोग्य सेवा संचालनालयाने परत औरंगाबाद आरोग्य सेवा उपसंचालकांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकारी जर परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केली. खुलताबाद तालुक्यात होणार्या अपघातांची संख्या पाहता याठिकाणी त्वरित ट्रामा केअर सेंटर मंजूर करावे, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे रूग्णांना मिळणारे आर्थिक लाभाचे दर मागील दहा वर्षांपासून तसेच आहेत. त्यामुळे यामध्ये देखील वाढ करावी अशी आग्रही मागणी आ. चव्हाण यांनी सभागृहात केली.
यावेळी उत्तर देतांना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहेत. मात्र खुलताबाद तालुक्यातील अपघाताची तीव्रता पाहता याठिकाणी खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर मंजूर केल्याची घोषणा विधान परिषदेत केली. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रूग्णांना मिळणार्या आर्थिक लाभामध्ये निश्चितच सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.