राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हलची भाडेवाढ; मुंबईसाठी लागतात ८०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:02 AM2021-08-20T04:02:12+5:302021-08-20T04:02:12+5:30
कोरोना महामारीमुळे शहरातील १५० खासगी ट्रॅव्हल बसपैकी केवळ ५० बस चालविल्या जात होत्या. सध्या सुट्टीच्या दिवशी प्रवासीसंख्या अधिक असल्यामुळे ...
कोरोना महामारीमुळे शहरातील १५० खासगी ट्रॅव्हल बसपैकी केवळ ५० बस चालविल्या जात होत्या. सध्या सुट्टीच्या दिवशी प्रवासीसंख्या अधिक असल्यामुळे एखाद-दोन बस वाढविण्यात येत आहेत. बसची देखभाल, वाढलेल्या इंधन खर्चाची तरतूद करताना बसचालकांची मोठी तारेवरची कसरत होत आहे. शासनाने खबरदारी घेत निर्बंध उठवले असले तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना शासनाकडून वारंवार दिल्या जात आहे.
प्रवासी वाढले असले तरी प्रवासी टिकवून ठेवण्याकरिता भाववाढ केलेली नाही. औरंगाबाद, मुंबई व पुणे, नागपूर जाणाऱ्या गाड्या जेमतेम सुरू आहेत. राखी पौर्णिमा सण असला तरी कोरोनाच्या दहशतीमुळे थोडेफार प्रवासी बाहेर येत आहेत. बसने जाण्यापेक्षा प्रवासी खासगी कारने प्रवास करीत आहेत. कारण बसमध्ये कोरोनाची बाधा होण्याची भीतीही वाटत आहे. असे प्रवाशांचे मत झाले आहे. परंतु एकट्याने प्रवास करायचा झाल्यास बस किंवा खासगी ट्रॅव्हल बसशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी प्रवाशाला आठशे रुपयेपर्यंत प्रवासभाडे मोजावे लागत आहे.
डिझेल वाढीमुळे भाडेवाढीची शक्यता...
डिझेलचे भाव वाढल्यामुळे खासगी बसचालकांना आर्थिक फटका बसत आहे. प्रवाशांना टाळता येत नाही, ते टिकवण्यासाठी भाववाढ केलेली नाही. अजून बहुतांश ट्रॅव्हलची ऑफिसेस बंद आहेत. पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला नाही तर कार्यालये सुरू होतील. सध्या ५० ट्रॅव्हल बस चालविल्या जात आहेत. मुंबई, नागपूर, पुणे जाणाऱ्या गाड्यांना थोडेफार प्रवासी मिळतात. आता तर नाही; पण पुढील महिन्यापासून भाववाढीचा विचार होऊ शकतो. प्रवाशांना परवडेल असे भाडे आहे. कोरोना नियमांचे पालन करून सध्याची खासगी बस नियमितपणे सुरू आहे. सणामुळे फरक पडलेला दिसत नाही. - राजन हौजवाला